* रंगमंचावरील कलाकारांना ‘राजभाषे’चा आश्रय
* २१ नव्या कलाकारांना थेट चित्रपटात महत्त्वाची भूमिका
महाविद्यालयीन स्तरावर होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन एकांकिका ही मराठी चित्रपटसृष्टीत शिरण्यासाठीची पहिली पायरी मानली जाते. एकांकिका स्पर्धामधून प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, मराठी मालिका आणि मग चित्रपट अशी शिडी चढून, संघर्ष करत नावारूपाला आलेले अनेक कलाकार प्रसिद्ध आहेत. मात्र प्रायोगिक, व्यावसायिक नाटक, मराठी मालिका या मधल्या पायऱ्या वगळून थेट मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत झळकण्याची संधी २१ तरुण कलाकारांना मिळणार आहे. हृषिकेश पाटीलनिर्मित ‘राजभाषा’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांनी रीतसर चाचणी घेऊन या कलाकारांची निवड केली आहे.
‘राजभाषा’ हा चित्रपट प्रामुख्याने तरुणाईचा आहे.
या चित्रपटात काम करण्यासाठी आम्हाला १५ ते ३५ या वयोगटातील कलाकारांची गरज होती. मात्र या वयोगटातील नावारूपाला आलेले कलाकार आज मराठी चित्रपटसृष्टीत खूप कमी आहेत. त्यामुळे आपण रंगभूमीवर काम करणाऱ्या आणि एकांकिकांसारखे प्रयोगशील माध्यम हाताळणाऱ्या कलाकारांची निवड करण्याचे ठरवले, असे मर्गज यांनी सांगितले.
या कलाकारांची निवड करण्यासाठी मर्गज यांनी दोन दिवसीय कार्यशाळा घेतली होती. साधारणपणे कलाकारांची निवड चाचणी करताना फक्त पाच ते दहा मिनिटांचा वेळ दिला जातो. मात्र आम्ही तसे न करता या सर्वासाठी २० तासांची कार्यशाळा घेतली. त्यातून या २१ कलाकारांची निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 नवख्या कलाकाराच्या वाटय़ाला चित्रपटात फार तर गर्दीच्या दृष्यातील एखादी छोटेखानी भूमिका किंवा एखाद्या वाक्याची भूमिका येते. मात्र या सर्व २१ कलाकारांना आपल्या चित्रपटात चांगलीच भूमिका आहे, असेही ते म्हणाले.
या कलाकारांमध्ये प्रामुख्याने मुंबईतील कलाकारांचा समावेश असला तरीही रायगड आणि बीड येथीलही काही कलाकारांची निवड झाली आहे. या २१ प्रमुख कलाकारांसह १० साहाय्यक भूमिकांसाठीही अशाच प्रकारे निवड झाल्याचे मर्गज म्हणाले.
‘स्पेशल २१’ कलाकार
यतीन खामकर, रेश्मा पोळ, सागर गुजर, नीलेश गोसावी, आनंद प्रभू, मंदार इथापे, विजय हिवारे, अमोल मोरे, सोनी जाधव, सुप्रिया जाधव, आशिष कटारे, महेश वरवडेकर, विजय गीते, वृषाली हटाळकर, प्रशांत केणी, कोमल थोरवे, अतुल सणस, अशोक चार्वाक, गौरव मालणकर, सागर जाधव, अक्षय भोसले.