ठाणे महापालिकेची भटक्या कुत्र्यांवरील प्रजनन प्रतिबंधक शस्त्रक्रिया मागील नऊ महिन्यांपासून रखडल्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा आकडा वाढताच खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेने निर्बीजीकरणासाठी तातडीने पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून एका कुत्र्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी १२५० रुपयांची तजवीज करण्यात आली आहे. याशिवाय चावऱ्या कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांना श्वानदंश प्रतिबंधक लस देण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. येत्या स्थायी समिती सभेत या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर लगेच कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या सुमारे ४५ हजार इतकी होती. त्यापैकी सुमारे ३५ ते ४० हजार कुत्र्यांवर महापालिकेमार्फत प्रजनन प्रतिबंधक शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच त्यांना श्वानदंश प्रतिबंधक लस देण्याची मोहीमही राबविण्यात आली. निर्बीजीकरण तसेच लस देण्याच्या दरांमुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे मागील नऊ महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया रखडली आहे. तब्बल नऊ महिन्यांपासून निर्बीजीकरण थांबल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्या ५० हजारांहून अधिक झाली आहे. पन्नास हजारांची ही फौज ठाणेकर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येला आवर घालण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या विषय पटलावर मंजुरीसाठी आणला आहे. या कामासाठी दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये खर्च होणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कळवा, मुंब्रा, माजिवाडा, मानपाडा, वागळे तसेच शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागातील भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झालेली नसल्यामुळे येथे कुत्र्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. भुंकणे, चावणे आणि वाहनांच्या पाठीमागे लागणे यांसारख्या उपद्रवामुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. त्यामुळे दाट लोकवस्ती तसेच ज्या भागात कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झालेली नाही, अशा ठिकाणी शस्त्रक्रिया मोहीम राबविण्याचा महापालिकेचा विचार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
तर नेत्रदान नाही
ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे १९ लाखांच्या घरात असून शहरात भटक्या कुत्र्यांचा आकडा ५० हजारांहून अधिक आहे. म्हणजेच, ४० ठाणेकरांमागे एक भटका कुत्रा आहे. कुत्र्याची मादी एका वर्षांत सुमारे १० ते १२ पिलांना जन्म देते. त्यापैकी ५० टक्के पिल्ले जगतात. हे भटके कुत्रे वाहनांच्या पाठीमागे लागत असल्यामुळे अपघात होतात. चावणे, भुंकणे अशा प्रकारांमुळे लहान मुले घाबरतात. तसेच कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजसारखा आजार जडतो. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात. विशेष म्हणजे, कुत्रा चावलेल्या व्यक्तीस मरणोत्तर नेत्रदान करता येत नाही, अशी माहिती जाणकरांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
भटक्या कुत्र्यांचा महापालिकेस फटका
ठाणे महापालिकेची भटक्या कुत्र्यांवरील प्रजनन प्रतिबंधक शस्त्रक्रिया मागील नऊ महिन्यांपासून रखडल्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला आहे.
First published on: 22-01-2014 at 07:48 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Street dogs becomes trouble for tmc