शहरात नव्यानेच सुरू झालेल्या मल्टिलेव्हल कार पार्कीगमुळे सीताबर्डी परिसरातील कार पार्किंग ची समस्या सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागपूर सुधार प्रन्यास आणि रॉय उद्योग समूह यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पामुळे नागपूरने देशातील काही शहरांच्या यादीतही आपले नाव कोरले आहे.
शहरात दिवसेंदिवस चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक भागात पार्किंग ची समस्या भेडसावू लागली आहे. रस्त्यांची रुंदी मात्र वाढत नाही. अशा स्थितीत पार्कीगच्या समस्येवर कसा तोडगा काढावा, याचा शोध सुधार प्रन्यास घेत होते. किमान शहरातील गर्दीच्या ठिकाणीतरी कमीतकमी जागेत पार्किंगची  समस्या सुटावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी चार वर्षांपूर्वी सुधार प्रन्यासने सीताबर्डी येथे सिनेमॅक्सच्या शेजारी मल्टीलेव्हल कार पार्किंग  प्रकल्प राबवण्याची योजना आखली. रॉय उद्योग समूहाला  बीओटी (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्वावर हा प्रकल्प बांधण्यास सुधार प्रन्यासने मंजुरी दिली. रॉय उद्योग समुहाने नऊ महिन्यापूर्वीच हा प्रकल्प बांधून पूर्ण केला. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी ३ कोटी रुपये खर्च आला.
या मल्टिलेव्हल कार पार्किंग सुविधेचे मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झाले. या पार्किंग प्लाझामध्ये चार टॉवर असून प्रत्येक टॉवरमध्ये एकाचवेळी १८ कार अशा एकूण ७२ कार उभ्या राहू शकतात. दोन टॉवर मिळून एक असे दोन भाग करण्यात आले आहे. कार ठेवण्याची आणि काढण्याची प्रक्रिया ही स्वयंचलित पद्धतीने पार पाडल्या जाते. कार ठेवायची असल्यास ती आधी ट्रे वर ठेवली जाते. तत्पूर्वी कारच्या क्रमांकाची संगणकात नोंद केली जाते. ट्रे ला चार चाके असून दोन भागाला दोन हुक आहेत. यालाच ‘पिकिंग हूक’ असे म्हणतात. हा ट्रे हुकला अडकवला जातो. यानंतर हव्या त्या ठिकाणी हा ट्रे हलवला जातो. ट्रे वर कार असल्याने ती जेथे ठेवायची आहे, तेथे ठेवली जाते. ज्यावेळी कार बाहेर काढावयाची आहे, तेव्हा कारचा क्रमांक नोंदवून ती लिफ्ट त्या कारजवळ जाते. अशा पद्धतीने टॉवरमध्ये कार कुठेही असली तरी ती कार काही वेळातच बाहेर येते. या कार प्लाझामुळे कारमालकांची अनेक गैरसोयींपासून सुटका होणार आहे. रस्त्यावर कार पार्कीकमुळे जे धोके संभवतात, त्यापासून ही कार सुरक्षित राहते. वेळेचे बंधन नसल्याने कारविषयीची भीती नसते. काही वेळेसाठी का असेना रस्त्यावरील पार्किंग ची समस्या दूर होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळाही निर्माण होत नाही. पार्किंग प्लाझामध्ये तीन तास कार ठेवायची असल्यास त्यासाठी २५ रुपये द्यावे लागतात. साधारण ३ ते ६ तासांसाठी ४५ रुपये, ६ ते ९ तासासाठी ६० रुपये, ९ ते १२ तासासाठी ७५ रुपये आणि १२ ते २४ तासासाठी १०० रुपये भाडे घेतले जात असल्याची माहिती पार्किंग प्लाझाचे व्यवस्थापक कौस्तुभ देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. एकाच वेळी ७२ कार या प्लाझामध्ये राहू शकत असल्याने तेवढीच वाहने रस्त्यावर कमी राहतील. त्यामुळे वाहतुकीची समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकते.
न्यायालयीन लढाई
कार प्लाझा हा प्रकल्प पूर्ण होऊन दहा महिने झाले होते. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे त्याचे उद्घाटन लांबले होते. ज्या उद्देशाने हा प्रकल्प तयार करण्यात आला, त्यालाच तडा जात होता. त्यामुळे मनीष सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून हा प्रकल्प सुरू करण्याचे आदेश सुधार प्रन्यासला द्यावेत, अशी विनंती केली होती. या याचिकेवर मागच्याच महिन्यात सुनावणी होऊन हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश सुधार प्रन्यासला खंडपीठाने दिले होते. या आदेशानुसार १ सप्टेंबरपासून हा प्रकल्प सुरू झाला. त्याचे औपचारिक उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. या प्लाझामुळे शहरातील पार्किंगची समस्या मार्गी लागेल, अशी अपेक्षा सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता एस.एच. गुज्जेलवार यांनी व्यक्त केली. असे पार्किंग  प्लाझा देशातील दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई यासारख्याच शहरात आहेत. त्यात आता नागपूरचीही भर पडली आहे.