प्रवाशांच्या सोयीसुविधांचा विचार करून त्यांच्या विविध समस्या रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपनगरीय रेल्वे यात्री उपभोक्ता समितीची बैठक गुरुवारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पार पडली. सततचा तांत्रिक बिघाड, त्यामुळे कोलमडणारी मध्य रेल्वे, दर दिवशी दिरंगाईने धावणाऱ्या गाडय़ा, स्थानकांवरील प्रसाधनगृहांचे हाल अशा नेहमीच्याच समस्यांवर या बैठकीत खडाजंगी चर्चा झाली. या बैठकीत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांच्यासह रेल्वेच्या सर्वच प्रमुख विभागांचे अधिकारी आणि समितीचे १५-१६ सदस्य उपस्थित होते.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या विविध समस्या रेल्वे प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाशी चर्चा करून प्रवाशांना विविध सुविधा पुरवण्यासाठी उपनगरीय रेल्वे यात्री उपभोक्ता समिती काम करते. या समितीची बैठक दर दोन महिन्यांनी होते. मात्र ऑगस्ट महिन्यानंतर ही बैठकच झाली नव्हती. अखेर गुरुवारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने उपनगरीय मार्गावर सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड, दिरंगाईने धावणाऱ्या लोकल गाडय़ा, अस्वच्छ प्रसाधनगृहे या समस्यांवर चर्चा झाली. तसेच या समस्यांचे निराकारण लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्वासन निगम यांनी दिल्याचे समिती सदस्य आणि समन्वयक अनिकेत घमंडी यांनी सांगितले.
उपनगरीय स्थानकांवरील प्रसाधनगृहांची अवस्था बिकट आहे. ही प्रसाधनगृहे सामाजिक संस्थांना चालवण्यास दिल्यास त्याची योग्य निगा राखली जाईल, असे समितीने याआधीच सूचित केले होते. मात्र त्याबाबत रेल्वे प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही, हा मुद्दा या बैठकीत चर्चेला आला. आठवडाभरात या संस्थांशी संपर्क साधला जाईल, असे आश्वासन या वेळी प्रशासनातर्फे देण्यात आले. मध्य रेल्वे जेटीबीएस आणि एटीव्हीएम यांचा प्रसार करत असून प्रशासनाने त्याबाबतच्या सूचनाही मागितल्या. त्यावर दिवा ते भिवंडी या पट्टय़ातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन तेथेही ही सुविधा द्यावी, अशी सूचना समितीने केल्याचे घमंडी म्हणाले.
कर्जत जलद लोकलचे काय?
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून रात्री ९.२० वाजता सुटणारी कर्जत जलद लोकल दर दिवशी परळ स्थानकात येऊन दहा मिनिटे थांबवली जाते. या लोकलच्या पुढे निघालेल्या चालुक्य एक्सप्रेसला दादर येथे थांबा असल्याने मुंबईहून वेळेत निघूनही कर्जत लोकलला पुढे उशीरच होतो. त्यामुळे या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे रोज हाल होतात. याबाबत रेल्वे प्रशासन काय करणार, असा प्रश्नही घमंडी यांनी उपस्थित केला. त्यावर, याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल आणि ही गाडी विनाव्यत्यय मार्गस्थ होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले.