सीमाभागातील एका ऊस उत्पादक शेतक ऱ्याने बुधवारी बेळगाव विधानसभेसमोर आत्महत्या केली. या प्रकारामुळे विधिमंडळाच्या कामकाजावेळी प्रचंड गोंधळ झाला. आत्महत्या केलेल्या विठ्ठल आरभावी या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केली. यापूर्वी कर्नाटक शासनाने उसाला २५०० रुपये दर जाहीर केला असून त्यामध्ये आणखी काही वाढ करण्याबरोबरच व्हॅट रद्द करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकामध्ये गेल्या महिन्याभरापासून ऊस दराचे आंदोलन चांगलेच तापले आहे. या भागात स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकच आक्रमक होऊ लागली आहे. उसाचा प्रश्न तापला असताना बुधवारी विठ्ठल आरभावी (वय ५० रा.कंकणवाडी, जि.रायबाग) या शेतकऱ्याने बेळगाव येथील विधानसभेसमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या शेतकऱ्याचे तिराणी शुगर्स या कारखान्याकडून गतहंगामातील उसाचे बिल थकीत होते, असे सांगितले जाते. या आत्महत्येमुळे सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी शेतकरी विरोधी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याचा खून झाल्याचा आरोप केला. ऊस प्रश्नावरील वाद आटोक्यात आल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आरभावी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने १० लाख रुपयांची मदत जाहीर केली.
आमदार पाटील यांचे कार्यालय फोडले
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगावचे आमदार संभाजी पाटील यांच्या बेळगाव महापालिकेतील कार्यालयावर कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी हल्ला चढवित पुन्हा एकदा मराठी व्देषाची प्रचिती घडविली. आमदार पाटील यांनी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर मराठी भाषेतून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वेदना मांडण्यास सुरुवात केल्यानंतर कन्नड आमदारांनी त्यास जोरदार विरोध केला होता. त्याच दिवशी आमदार पाटील यांचे कँम्प भागातील कार्यालय कन्नडिग्गांनी फोडले होते. तर आज आमदार पाटील यांच्या बेळगाव महापालिकेतील कार्यालयावर हल्ला चढविण्यात आला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आमदार संभाजी पाटील नावाच्या मराठी फलकाची मोडतोड केली. त्यांच्या दालनात व कागदपत्रांवर काळी शाई ओतण्यात आली.