काही दिवसांपासून उन्ह, पावसाचा खेळ सुरू असतानाच गुरुवारी विदर्भ तापला. वर्धा शहरात  ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल अमरावती ४३.८, ब्रम्हपुरी ४३.३,  नागपूर व अकोला ४३.१, चंद्रपूर ४२.६, यवतमाळ ४२.२, वाशीम ४१.४, गोंदिया ४१.१ आणि बुलढाणा शहरात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
दुपारची वेळ.. स्टारबसमधील सीट्स मात्र बऱ्यापैकी रिकाम्या.. बहुसंख्य नागरिक बसच्या दाराजवळच उभे.. कारण बसमध्ये जागा असली तरी कोणालाही आतमध्ये बसून शिजून निघायचे नाही.. शहरातील विविध भागातील रिक्षास्टॅंडवर एखादा दुसरा रिक्षाचालक झाडाच्या सावलीत बसलेला दिसतो. एकही रिक्षा मिळत नाही. एरव्ही चालत व बसने जाणारे कमी अंतरासाठीही रिक्षाचा आधार घेत आहेत. वाढत्या उन्हात बससाठी उभे राहणाऱ्यांची संख्या काहीशी कमी झालेली.. एरवी दुपारच्यावेळी बाजारपेठेत खरेदीसाठी फिरणाऱ्या लोकांची गर्दी कमी झाली असून दुकानदार कुलर किंवा वातानुकुलीत लावून गिऱ्हाईकाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे. ताक, ज्युस, लिंबू शरबत, उसाचा रस, लस्सी अशा ठंडा ठंडा कुल स्टॉल्सचा धंदा जोरात चालला आहे. गिऱ्हाईकांना थंडावा देता देता विक्रेते आपली तहान आपल्या शीतपेयानी शमवत आहेत..ही सारी यंदाच्या उन्हाळ्याची सर्वत्र चित्रे आहे.
तापमान कमी असो व जास्त, हवेतील आद्र्रता वाढली तर उकाडय़ाचे प्रमाण अधिक जाणवते. गेल्या काही दिवसात उकाडय़ाची दाहकता जास्त वाढली असून विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ाच्या ठिकाणचे तापमान सरासरीच्या वर गेले आहे. दुपारच्या तापमानाने तर बहुतेक ठिकाणी ४४ अंशवर पोहोचले आहे.
सध्याची हवामानाची स्थिती पाहता उकाडय़ात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना या उन्हाच्या तडाख्यापासून सध्या तरी दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाही. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात उन्हामुळे खासगी आणि शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. सरकारी व खाजगी कार्यालयात जाणारी चाकरमानी मंडळी सकाळी घरून निघताना स्कार्फ बांधून व जवळ एखादा कांदा ठेवत निघतात. एरवी दर एक तासाने सरकारी व खासगी कार्यालयाच्या बाहेर चहासाठी किंवा मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी बाहेर पडणारे कर्मचारी व अधिकारी दुपारी १२ ते ३ वाजताच्या सुमारास चहाच्या टपरीवर दिसत नाहीत. विशेषत आकाशवाणी चौक किंवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेहमी दिसणारी वर्दळ दुपारच्यावेळी दिसत नाही. अनेक कार्यालयात नेहमीचा ठरलेला चहावालाच कर्मचाऱ्यांना चहा नेऊन देत असल्याचे चित्र बघायला मिळाले. सिव्हील लाईन भागातील महापालिका परिसरातील ताक विक्रेत्याकडे दुपारच्यावेळी ताकचा आस्वाद घेणारी मंडळी फारशी दिसून येत नाही. अचानक वाढलेल्या तापमानामुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले भारनियमन जिल्ह्य़ात आणि शहरातील काही भागात सुरू झाल्यामुळे लोकांना उकाडय़ापासून दिलासा नाही.