बेंगलोरहून नांदेडात रेल्वे पार्सलने आलेला सुमारे १० लाख रुपयांचा गुटखा रेल्वे पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला एटक करण्यात आली आहे.
राज्य सरकारने राज्यात गुटखा तसेच पान मसाल्यावर बंदी घातली आहे. असे असले तरी लगतच्या आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात गुटखा विक्रीला मुभा आहे. नांदेडात बंदीचा फारसा परिणाम झाला नाही. जादा दराने, छुप्या मार्गाने अनेक ठिकाणी गुटख्याची विक्री होते. बेंगलोरहून आलेल्या एका रेल्वे पार्सलमध्ये ‘राज कोल्हापुरी’ नावाचा गुटखा नांदेडला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बेंगलोरहून येणाऱ्या हम्पी एक्सप्रेसने ३० नोव्हेंबर रोजी हा गुटखा आला. गोपालभाई यांच्या नावाने आलेल्या या गुटख्यावर नारळी दोरीचे पार्सल असा उल्लेख होता.
गुटख्याचे हे पार्सल घेण्यासाठी आज निसार अहमद (रा. गोवर्धन घाट) हा आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. सर्व पार्सलचे सील तोडण्यात आले. तेव्हा त्यात तब्बल १० लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी निसार अहमद याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. नांदेड जिल्ह्य़ात यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाने मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त केला होता.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten lakhs guthkha found wich were came from karnatak