अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचा लाभ, मानधन, महागाई भत्ता, वार्षिक मानधनवाढ मिळावी इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या शेकडो महिला हातात थाळी  वाजवत वाजवत जिल्हा परिषदेत धडकल्या. महिलांच्या या धडकेने जिल्हा परिषद प्रशासनास अक्षरश: धडकी बसली. थाळीनादाने आसमंत दणाणला. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेत बेमुदत ठिय्या धरणे देण्याचा पवित्रा या अंगणवाडी कर्मचारी महिलांनी घेतला होता. अखेर दंगल नियंत्रण पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले.
सेवा समाप्तीचा प्रश्न २००४ पासून प्रलंबित आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २००५ पासून सेवानिवृत्ती वेतन लागू करण्याची शासकीय अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार सेविकांना १ हजार रुपये व मदतनिसांना ५०० रुपये सेवानिवृत्ती वेतन देणे गरजेचे होते; परंतु महाराष्ट्र सरकारने याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. तसेच अंगणवाडी सेविकांना २० वर्षांच्या सेवेनंतर १ लाख रुपये व नंतर प्रत्येक वर्षांच्या सेवेकरिता ५ हजार रुपये, तर मदतनिसांना २० वर्षांच्या सेवेनंतर ३५ हजार रुपये व प्रत्येक वर्षांच्या सेवेसाठी ३ हजार ७५० रुपये याप्रमाणे सेवा समाप्तीनंतर लाभ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. तो प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. २०११ मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवाशर्तीविषयक अभ्यास करून खासदार चंद्रेशकुमारी यांच्या अध्यक्षतेखाली २१ खासदार महिलांच्या संमतीने लोकसभेत व राज्यसभेत अहवाल सादर करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योग्य वेतन, महागाई भत्ता, वार्षिक मानधनवाढ, प्रॉव्हिडंट फंड, पेंशन ग्रॅच्युटीचा लाभ देण्याची शिफारसही केली. मात्र, याची दखल घेतली गेली नाही. याचा लाभ मिळावा याकरिता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगला सराफ, विजया सांगळे, अरुणा अलोणे, अनिता कुळकर्णी, सुषमा पांडे यांच्या नेतृत्वाखाली ८ नोव्हेंबरला दारव्हा येथून यवतमाळ जिल्हा परिषदेवर धडक देण्यासाठी पदयात्रा काढली होती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ही पदयात्रा थाळीनाद मोर्चाच्या रूपाने जिल्हा परिषदेवर धडकली. या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी होत्या.