युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा त्रिखंडात प्रसिद्धी मिळवणाऱ्या भारतीय चित्रपटांना दक्षिण आफ्रिकेत फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. भारतीयांना केवळ क्रिकेटमुळे माहिती असलेल्या या देशातील डरबन या शहरात सर्वाधिक भारतीय राहतात. त्यामुळे भारतीय मनोरंजनसृष्टीला एक नवे कवाड उघडून देण्यासाठी सेलिब्रिटी लॉकर्स या फॅशन इंडस्ट्रीतल्या कंपनीने पुढाकार घेतला असून दक्षिण आफ्रिकन सरकारसह त्यांनी ‘साऊथ आफ्रिका इंडिया फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन अ‍ॅवॉर्ड्स’ ही संकल्पना पुढे आणली आहे. विशेष म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला डरबनच्या क्षितिजावर स्थान देण्यात सेलिब्रिटी लॉकर्सच्या केदार गावडे या मराठी तरुणाचा मोठा हात आहे. डरबनमध्ये ६ सप्टेंबर रोजी पहिला पुरस्कार सोहळा होत आहे.
 बॉलीवूडने आतापर्यंत रशिया, युरोपमधील काही देश, अमेरिका, दुबई वगैरे देशांमध्ये आपले पाय रोवले आहेत. मात्र दक्षिण आफ्रिकेत बॉलीवूडचा म्हणावा तसा प्रसार झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांची संख्या लक्षणीय असताना आपण त्यासाठी का पाऊल उचलू नये, या विचाराने आम्ही या पुरस्कार सोहळ्याची संकल्पना दक्षिण आफ्रिकन सरकारपुढे मांडली, असे गावडे यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना स्पष्ट केले.  भारतातील नृत्यप्रकार किंवा संगीतप्रकार, येथील संस्कृतीचे दर्शन या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांना घडेल. त्याचप्रमाणे तेथील लोकांच्या परंपरा भारतीय कलाकारांना जाणून घेता येतील. यासाठी या पुरस्कार सोहळ्याबरोबरच काही कार्यशाळांचे आयोजनही केले जाणार आहे, असे गावडे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The popularity of indian entertainment industry now in darban