हजारो स्थलांतरित पक्षांचे आश्रयस्थान असलेल्या लोहारा तलावात फासे टाकून शिकारीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना गोंदिया निसर्ग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व वनविभागाने काल सायंकाळच्या सुमारास अटक केली.
लोहारा येथील तलावावर ग्रेलेकगुज, कॉमन पोचार्ड, रेड क्रेस्टेड पोचार्ड, लेसर विस्लीन डक, ग्रेटर लेसर विस्लीन डक्स व सारस पक्षी आहेत. या पक्ष्यांच्या शिकारीसाठी तीन व्यक्तींनी दोन मोठे फासे लावले होते. ही माहिती निसर्ग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. मंडळाचे मानद सदस्य सावन बहेकार यांनी ही माहिती वनविभागाला दिली. वन विभागाचे कर्मचारी दोन वेळा त्या ठिकाणी जाऊन आले, परंतु शिकारी त्यांच्या हातात लागले नाही. त्यानंतर सायंकाळी निसर्ग मित्र मंडळाचे सावन बहेकार, शाबाज खान व मोबाईल स्कॉडचे बघेले व पाटील हे चौघेही या तलावावर गेले. यावेळी ते शिकारी पक्ष्यांना जाळ्यात अडकविण्यात मग्न होते. त्यांनी दोन झोपडय़ाही त्या तलावावर उभारल्या होत्या. पक्ष्यांना फास्याकडे आकर्षति करण्यासाठी दाणेही टाकले होते. एका फास्यात एकाच वेळी २०० ते ३०० पक्षी अडकतील, असा मोठा फासा त्यांनी लावला होता, मात्र वनविभागाचे कर्मचारी व निसर्ग मित्र मंडळाच्या सदस्यांना पाहून हे फासे मांडणारे शिकारी पळू लागले.
पाठलाग करून सावन बहेकार यांनी पुरनलाल भीमराव मेश्राम (५५, रा.रतनारा) याला पकडून वन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्या शिकाऱ्यांजवळून दोन कुऱ्हाडी, एक विळा जप्त करण्यात आला. त्यांनी दिलेल्या माहितीवरून आज विजय चौतराम बागडे (२२) व रामेश्वर रतन मेश्राम (२२, रा.रतनारा) यांना अटक करण्यात आली.
गेल्या वर्षी याच ठिकाणी सारस जोडप्याची शिकार करण्यात आली होती. दोन-तीन वर्षांंपूर्वी स्थलांतरित पक्ष्यांच्या शिकारीसाठी अन्नात विष टाकण्यात आले होते. दरवर्षी हजारोंच्या संख्येने येथे स्थलांतरित पक्षी व स्थानिक पक्षीही असतात, मात्र या तलावावरील पक्षी सुरक्षित नसल्याने लोहारा तलाव पक्ष्यांसाठी राखीव करण्याची मागणी निसर्ग मित्र मंडळातर्फे करण्यात आली आहे.