प्रत्येकाला एक भूतकाळ असतो. त्याच्या भूतकाळात सतत कुणीतरी त्याला खुणावत असते. त्याच्या या भूतकाळाशी ओळख करून देण्याचे काम ‘टाईमपास’ चित्रपटाने केले. मात्र यातुन पुढे काय ही प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आणि दगडुच्या भूतकाळाशी प्रत्येक जण स्वतची तुलना करू लागला. यामुळे टाईमपासचा सिक्वेल आकारास आला. मात्र प्रेक्षकांची उत्सुकता हे चित्रपट निर्मितीसाठी आव्हान ठरल्याचे मत दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केले.
‘टाईमपास २’ चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होत असून या पाश्र्वभूमीवर येथे आयोजित पत्रकार परिषदेस जाधव यांच्यासह एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनचे निखील साने, प्रियदर्शन जाधव, प्रिया बापट, वैभव मांगले उपस्थित होते. मराठी सिनेसृष्टीत सध्या विविध प्रयोग, विषय हाताळले जात आहेत. या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग होत आहेत. हिंदी सिने सृष्टीप्रमाणे काही मराठी चित्रपटांबाबत मराठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाचा विषय, मांडणी, संगीत, तंत्रज्ञान यासह सोशल मीडिया या सर्वाचा हातभार लागल्याने सोन्याचे दिवस आले आहेत. टाईमपास तयार होत असतांना अल्लड वयोगट, त्यांची द्विधा मनस्थिती समोर होती. नकळत्या वयात प्रेमाचा साक्षात्कार झाला. पण ते प्रेम होते की टाईमपास, या पंचलाईनवर तो संपुर्ण चित्रपट राहिला. ‘टाईमपास २’ सिक्वेलमध्ये काळ १५ वर्षांनी पुढे गेला. दगडुचा रॉकी झाला. चांगला व्यक्ती म्हणून समाजात नावलौकीक असतांना त्याचा भूतकाळ त्याला खुणावतोय तर प्राजक्तालाही एका वळणावर परत एकदा मागे फिरून बघावसे वाटते नेमके काय झाले, दगडु आणि प्राजक्ता यांचे प्रेम सफल झाले काय? यासाठी चित्रपट जरूर पहावा असे जाधव यांनी सांगितले.
निखील साने यांनी १ मे रोजी चित्रपट राज्यासह बेळगाव, गोवा, इंदूर, गुजरात, दिल्ली यासह परदेशातही प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. ५०० चित्रपटगृहात एकाचवेळी तो प्रदर्शित होत आहे. ही भूमिका आपल्यासाठी सुवर्णसंधी ठरल्याचे प्रियदर्शनने सांगितले. प्रियाने संपुर्ण करमणुकीचे पॅकेज म्हणजे हा चित्रपट असून त्यात मानवी भावभावनाचे प्रतिबिंब आहे, प्राजक्तांचा सोज्वळ, निरागसपणा जपण्याचा प्रयत्न आपण केल्याचे नमूद केले. ‘टाईमपास २’ मध्ये महालक्ष्मी अय्यर, ॠषिकेश कामेरकर, अपेक्षा दांडेकर, शाल्मली खोलगडे, निखील डिसुझा, चिनार खारकर, विवेक नाईक यांनी स्वसाज दिला आहे. चित्रपटात प्रियदर्शन, प्रियासह मांगले, भाऊ कदम, संदीप पाठक, नयन जाधव, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, क्षिती जोग, उर्मिला कानेटकर, भूषण प्रधान यांच्याही भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘प्रेक्षकांची उत्सुकता ‘टाईमपास २’च्या निर्मितीसाठी आव्हान’
प्रत्येकाला एक भूतकाळ असतो. त्याच्या भूतकाळात सतत कुणीतरी त्याला खुणावत असते. त्याच्या या भूतकाळाशी ओळख करून देण्याचे काम ‘टाईमपास’ चित्रपटाने केले.
First published on: 17-04-2015 at 07:55 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time pass 2 team in nashik