जालना लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे इच्छुक आहेत. मागील वर्षभरापासून त्यांनी आपली ही इच्छा वेळोवेळी कधी खासगी बैठकीत तर कधी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखविलेली आहे.
सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे. काँग्रेसकडून ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडवून घ्यावी यासाठी अंकुशरावांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे. मराठवाडय़ातील हिंगोलीची जागा सध्याच्या वाटपात राष्ट्रवादीकडे असली तरी तेथून काँग्रेसचे आमदार राजीव सातव लोकसभेसाठी इच्छुक असून त्यांचे दिल्लीतील स्थान पाहता ते ही जागा स्वत:साठी सोडवून घेतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाले तर त्याबद्दल जालना लोकसभेची जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे म्हणजेच अंकुशराव टोपे यांच्याकडे येईल, याबद्दल त्यांचे समर्थक कमालीचे आशावादी आहेत.
जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्षांच्या निवडीसाठी काही महिन्यांपूर्वी जालना येथे झालेल्या मेळाव्यात अंकुशराव टोपे यांनी जाहीररीत्या आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे,तर ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडवून घ्यावी, यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणावा, असे आवाहन करण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिले नव्हते. गेल्या महिन्यात पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून आपण स्वच्छेने पायउतार होत असल्याचे जाहीर करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आपलण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे, तर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी अधिक वेळ मिळावा, हेही एक कारण त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सोडताना दिले होते.
अलिकडच्या काळात काही बैठका आणि साखर कारखान्याचे पुरस्कार स्वीकारण्याच्या निमित्ताने अंकुशरावांचे दिल्लीस अधिक जाणे-येणे वाढले. परंतु या निमित्ताने जालना लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीस सुटावी, यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधल्याची चर्चा जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात आहे.
जालना लोकसभा आणि भाजपचा विजय तसेच काँग्रेसचा पराजय हे समीकरण गेल्या पाच निवडणुकांपासून आहे. अंकुशराव १९९१ मध्ये त्यावेळच्या काँग्रेसकडून लोकसभा सदस्यपदी निवडून आले होते. त्यानंतर पक्षाची उमेदवारी त्यांना मिळाली नाही. पुढे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहिला. एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने परस्पर विरोधात निवडणूक लढविली होती, परंतु त्यावेळीही अंकुशरावांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.
मागील सलग पाच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ‘पंजा’चा पराभव झालेला हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीस सोडला तर भाजपचा पराभव होईल, असे टोपे समर्थकांना वाटत आहे. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले असले तरी २००९ मधील त्यांचा विजय जवळपास साडेआठ हजार मताधिक्याने झाला होता. त्यामुळे अंकुशराव भाजपचा पराभव करण्यासाठी योग्य उमेदवार असल्याचे त्यांचे समर्थक सहाही विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करून सांगत आहेत. विशेष म्हणजे जालना जिल्हाव्यतिरिक्त औरंगाबाद जिल्ह्य़ात असलेला या लोकसभा मतदारसंघाचा भागही स्वत:साठी अनुकूल असल्याचे मत अंकुशराव टोपे यांनी यापूर्वी वेळोवेळी मांडलेच आहे.