पावसाळी पर्यटनस्थळी गर्दीचे उच्चांक
अतिवृष्टीमुळे विदर्भात हाहाकार उडाला असला तरी सर्वत्र बहरलेल्या सृष्टीसौंदर्याचा आनंद लुटण्याची अभूतपूर्व संधी चालून आल्याने पावसाळी पर्यटन स्थळांवर वीकएण्डला पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असून विदर्भात पहिल्यांदाच असे चित्र पाहण्यास मिळत आहे. यंदाच्या पावसाने ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत विदर्भाला जोरदार दणका दिला. मान्सूनपासून सुरू झालेल्या पावसात खंड पडलेला नाही. जलसाठे काठोकाठ भरले आहेत. अनेक धरणे ओव्हरफ्लो झाल्यामुळे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे सर्वच जिल्ह्य़ांमधील लाखो हेक्टर शेती पाण्यात बुडाल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. परंतु, या अतिवृष्टीची दुसरी चांगली बाजू म्हणजे बहरलेल्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्याची अनोखी पर्वणी लोकांना चालून आली आहे.
पावसाच्या अतिरेकामुळे विदर्भातील अनेक धबधबे अक्षरश: ओसंडून वाहत असून रानफुलांनी निसर्ग व्यापला आहे. तेरडा, चिवडी, लीलीच्या रंगीबेरंगी फुलांचे सौंदर्य दिलखेचक असून याची दृश्ये टिपण्यासाठी निसर्ग छायाचित्रकारांनीही खास वेळ काढला आहे. पक्ष्यांची किलबिल जंगलांचे वातावरण प्रफुल्लित करू लागली आहे. पक्षी आणि प्राण्यांचा हा प्रजनन काळ असल्याने चिल्ल्यापिल्ल्यांसाठी खाद्याची बेगमी करण्यासाठी धडपडणाऱ्या पक्ष्यांच्या असंख्य जोडय़ा जंगलात विहरताना दिसू लागल्या आहेत. हिरव्यागार गवताची कुरणे तृणभक्षी प्राण्यांसाठी चैनीची संधी घेऊन आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात विशेषत: डोंगराळ भागातील निसर्ग यावर्षी काठोकाठ बहरल्याने एक वेगळेच सौंदर्य दृष्टीस पडत असून हा मोसम निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी ही नवी भेट घेऊन आल्यामुळे सुटीच्या दिवशी मिळेल त्या वाहनांनी लोक सहकुटुंब निसर्ग पर्यटनासाठी पोहोचत आहेत.
नागपूर शहरात यंदा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. शहरातील तलावातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी लोकांची अभूतपूर्व गर्दी शहराने अनुभवली. नागपूर जिल्ह्य़ाच्या परिसरात वडगाव, पेंच, रामटेक, खिंडसी, कुवाँरा भीवसेन, कर्पूरबावडी, मनसर, वडगाव धरण, गोंदियातील हॉजरा फॉल या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी छत्तीसगड, मध्य प्रदेशातील लोकांची गर्दी होते. सर्वाधिक पर्यटक यंदा चिखलदऱ्यात दिसू लागले असून उंच ठिकाणावरील चिखलदऱ्याच्या दऱ्याखोऱ्यात धबधब्यांचे आवाज मन मोहून घेत आहेत. भीमकुंडाचा दिलखेचक नजारा पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने लोक येताना दिसतात. अमरावतीच नव्हे तर विदर्भातील सर्वच ठिकाणांहून लोकांची गर्दी होऊ लागल्याने येथील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट वीकएण्डला फुल्ल झालेली असतात.
गोसीखुर्द, अंभोरा, खेकरानाला, मरकडा, टिपेश्वर, काटेपूर्णा, लोणार, बोथा, गाविलगडला लोकांनी पसंती दिली आहे. यावर्षीचा मोसम सुगीचे दिवस घेऊन आल्याचे अनेक हॉटेल मालकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. रामटेकचा खिंडसी तलाव २० वर्षांनंतर ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. खिंडसी हे भारताच्या पर्यटन नकाशावरील जलक्रीडा केंद्र असल्याने मोठय़ा प्रमाणात लोक आकर्षित होत असून गडमंदिरावरून निसर्गाचे लुभावणारे चित्र पर्यटक पाहताना दिसतात. धान पट्टय़ातील रोवणीचा हा हंगाम अनुभवणारे अनेक पर्यटक या भागात आवर्जून भेटी देतात. गाणी गात धानाची रोवणी करणाऱ्या बायांची अनोखी लगबग हा कृषी पर्यटनाचा वेगळाच आनंद देणारा अनुभव आहे, असे सीएसी ऑल राऊंडरचे संचालक अमोल खंते यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2013 रोजी प्रकाशित
विदर्भातील निसर्गपर्यटनाला अभूतपूर्व बहर
पावसाळी पर्यटनस्थळी गर्दीचे उच्चांक अतिवृष्टीमुळे विदर्भात हाहाकार उडाला असला तरी सर्वत्र बहरलेल्या सृष्टीसौंदर्याचा आनंद लुटण्याची अभूतपूर्व संधी चालून आल्याने पावसाळी पर्यटन स्थळांवर वीकएण्डला पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असून विदर्भात पहिल्यांदाच असे चित्र
First published on: 09-08-2013 at 09:29 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourism increase in vidharbha