भिवंडी शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागला असून या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीच्या आजार पसरण्याची  भीती व्यक्त होऊ लागली आहे. याच पाश्र्वभूमीवर पिण्याचे पाणी उकळून आणि गाळून घेण्याचा सल्ला महापालिकेने शहरवासियांना दिला आहे. तसेच घरातील पाण्याच्या साठवण टाक्या दिवसाआड स्वच्छ धुवून पाण्याचा दैनंदिन कामकाजाकरिता वापर करण्याच्याही सूचनाही केल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या तानसा जलवाहिन्यांमधून भिवंडी-निजामपूर महापालिकेस क्लोरिनयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. या पाण्याचे महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून शहरातील वेगवेगळ्या भागात वितरण करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ लागल्याने साथीचे आजार उद्भवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, यंदा पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव आणि धरण क्षेत्रात जास्त पाऊस झाल्यामुळे जलवाहिन्यांमधून गढूळ पाणी येत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तसेच या पाण्यामुळे साथीचे आजार उद्भवून नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून व गाळून घेण्याचे आवाहन भिवंडी महापालिकेने शहरवासियांना केले आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या साठवण टाक्या दिवसाआड स्वच्छ धुवून घेऊन पाण्याचा दैनदिन कामकरिता वापर करावा, असा सल्लाही दिला आहे.