देशाच्या ‘राष्ट्रीय सकल उत्पन्ना’तील अडीच टक्के वाटा अपघातांवर खर्च होत असेल तर त्यातील गांभीर्य आपण लक्षात घ्यायला हवे. ज्या देशात वाहनांची संख्या अधिक आहे, त्या देशात होणाऱ्या अपघातांच्या संख्येच्या २५ पट अपघात आपल्या देशात होतात, ही चिंताजनक बाब आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त शुक्रवारी व्यक्त केले.
राज्य महामार्ग पोलीस यांच्यातर्फे रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत ‘रस्ता सुरक्षा – काळाची गरज’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुबेर म्हणाले की, आपण आज जे इंधन उडवितो, त्यापैकी ८२ टक्के इंधन परदेशातून आयात करतो, याचे भान ठेवले पाहिजे. जगात दररोज ८५ लाख बॅरेल तेल उत्पादन होते. त्यापैकी २६ टक्के म्हणजे २२-२३ लाख बॅरेल तेल जगातील एकूण लोकसंख्येपैकी फक्त पाच टक्के इतक्या लोकांचे वास्तव्य असलेली अमेरिका वापरते. उर्वरित ७४ टक्के तेल १९९ देशांना मिळते. जे इंधन आपण सहज उडवितो, ते किती मौल्यवान आहे, याची जाणीव करून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. देशभरातील वाहतूक संघटनांकडून सरकारी यंत्रणांचा त्रास कमी करण्यासाठी तब्बल २२ हजार कोटी रुपये खर्च केले जातात, अशी धक्कादायक बाबही वाहतूकदार संघटनेच्या चर्चेतून समोर आल्याचे त्यांनी सांगितले. लंडनमधील एका विशिष्ट परिसरात गाडी नेल्यास कर भरावा लागतो. एक गाडी दोनदा या ठिकाणी आली आणि या गाडीने कर भरला नाही, असे तेथील कारकुनाच्या लक्षात आले. त्याने या गाडीचा क्रमांक आणि तिच्या मालकाचे नाव मिळविले. दंडाबाबत चलन पाठवायचे म्हणजे दंडापेक्षा अधिक खर्च येईल, असे त्याच्या लक्षात आले. परंतु तरीही त्याने ते चलन पाठविले. चलन स्वीकारणाऱ्याने दंडही भरला. ती व्यक्ती होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल. पत्ता होता व्हाईट हाऊस. अशी मानसिकता आपल्यामध्ये हवी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मानसोपचार तज्ज्ञ हरीश शेट्टी यांनी अपघातानंतर पीडितासाठी वरवरचे सांत्वन नको, असे सांगितले. अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला सोपस्कार पार पाडल्यासारखे भेटण्यासाठी जाऊ नका. उलटपक्षी संबंधित व्यक्ती वा तिच्या कुटुंबीयांना नेमकी कोणती मदत हवी आहे, याची विचारणा करा. सुरुवातीचे काही दिवस भेटण्यास जाण्याऐवजी सहा महिन्यापर्यंत आळीपाळीने कसे भेटता येईल, हे ठरवा. उगाच उपदेशाचे डोस पाजू नका वा फुकाचा सल्ला देऊ नका, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले.
मुंबई विद्यापीठाने एनसीसी हा स्वतंत्र अभ्यासक्रम फौंडेशन कोर्समध्ये अंतर्भूत केल्याची माहिती प्रा. राजपाल हांडे यांनी दिली. मुंबई-पुणे महामार्गावर गाडी चालकांकडे जागरूकता निर्माण करण्यासाठी नेमके काय करता येईल, याबाबत एका महाविद्यालयाने तयार केलेल्या प्रकल्पाची माहिती त्यांनी यावेळी दिली. याशिवाय पालीतील महाविद्यालयाने तयार केलेल्या पथनाटय़ाचेही सादरणीकरण केले.
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचे उपाध्यक्ष प्रवीण पुणतांबेकर यांनी सांगितले की, परदेशांत ट्रक चालकांना मानाचे स्थान आहे. त्यांना कॅप्टन संबोधले जाते. पंरतु आपल्याकडे चालक या जमातीकडे तुच्छतेने पाहिले जाते. आजही रस्त्याने ८० टक्के मालाची वाहतूक केली जाते. त्यामुळे हे चालक भारतीय अर्थव्यवस्थेचे हिरो आहेत. या चालकांना मानाचे स्थान दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तर सकाळ पेपर्सचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी असे सप्ताह साजरे करण्यापेक्षा नेमके लक्ष्य निश्चित करण्याची सूचना केली. एकही अपघात होणार नाही, असा दिवस पाळण्याची सूचना केली. आपल्याकडे रस्ते सुरक्षेबाबतचे सर्व अहवाल आहेत. परंतु त्याची अमलबजावणी कधी होणार, असा सवाल त्यांनी केला. ‘झी-२४ तास’चे मुख्य संपादक उदय निरगूडकर यांनीही अपघातांची संख्या कमी होत असली तरी मृतांची संख्या वाढत असल्याकडे लक्ष वेधले. वाहनांची संख्या वाढली आहे. परंतु रस्ते आहेत तेवढेच आहेत. रस्ते वाहतूक आजही सुरक्षित नाही. यासाठी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले