बेलापूर येथील सिडकोच्या अर्बन हाटमध्ये सध्या गणेश मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध राज्यांतील कलाकुसर असलेली उत्पादने विक्रीसाठी दाखल झाली असून ग्राहकांना अधिक आकर्षित करीत आहेत. सुटीच्या दिवशी नवी मुंबईकर या ठिकाणी मोठय़ा संख्येने हजेरी लावत आहेत.
ग्रामीण भागातील बचत गटांना आणि कलाकारांना त्याच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. या दृष्टिकोनातून अर्बन हाटची सिडकोने उभारणी केली. या माध्यमातून ग्राहकांना थेट उत्पादकांकडून माल खरेदी करता येत असल्याने स्वस्त दरात मिळत आहेत. एकाच ठिकाणी विविध राज्यांतील उत्पादने येथे मिळत आहेत. दसरा आणि दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर या मेळाव्यात विक्रीसाठी असलेली उत्पादने ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत. राजस्थान, हरियाणा, गुजरात येथील हातमागावरील साडय़ा, पंजाबी ड्रेस, पोती, कुडता, पायजमा हेदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. आंध्र प्रदेशमधील नारळापासून तयार करण्यात आलेल्या शोभेच्या वस्तू हे आकर्षण ठरत आहे.
तसेच राजस्थानी कारागिरांनी मार्बलपासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिसा, आंध्र प्रदेश, झारखंड, बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान छत्तीसगड, बंगाल अशा १८ राज्यांतून कारागिरांनी हस्तकलेच्या माध्यमातून तयार केलेल्या लाकडी वस्तू मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत. वारली पेंटिंगचा वापर करत तयार केलेले टी शर्ट, मोबाइल कवर, ग्रिटिंग कार्ड, भेटवस्तू यांसारख्या वस्तूदेखील येथे उपलब्ध आहेत. गवतापासून बनविलेली चिमण्यांची घरटी, घरे, प्राणी, पक्षी हे मेळाव्यातील आकर्षणच बनले आहे. फोर्मिगच्या आकर्षक बांगडय़ा, कर्णफुले, माळा, हिऱ्याचे सेट आदी ज्वेलरी या ठिकाणी उपलब्ध आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्बन हाटमधील मेळाव्यामध्ये हस्तकलेच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या वस्तू मिळतात. त्या वस्तू चायना वस्तूपेक्षा कित्येक पटीने आकर्षक असतात. म्हणून त्या घेण्यासाठी मी अर्बन हाटमध्ये लावण्यात येणाऱ्या मेळ्यामध्ये येत असते.
आकांक्षा रोडे, ग्राहक

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urban heart exhibition in navi mumbai