* ८ गावांमध्ये ९ विहिरी अधिग्रहित
* १०७२ कामांसाठी ५.६६ कोटींची तरतूद
जिल्ह्य़ातील जलसाठय़ात झपाटय़ाने घट होत असल्याने उन्हाळ्यातील जलसंकटाची चाहूल लागली आहे. लघु प्रकल्पांमधून शहरे आणि खेडय़ांची तहान भागवली जाते. या प्रकल्पांमध्ये आता अपुरा साठा असल्याने पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. पुढील तीन महिने पुरेल एवढा जलसाठा शिल्लक नसल्यामुळे मेपासून जूनच्या पंधरवडय़ापर्यंत पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्य़ात आतापर्यंत टंचाईग्रस्त ८ गावांमध्ये ९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
जिल्ह्य़ात पाच मोठे प्रकल्प, १३ मध्यम प्रकल्प व ६१ लघु प्रकल्प असून मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये केवळ २५ टक्के जलसाठा तर मोठय़ा प्रकल्पांमध्ये सरासरी ३४ टक्के साठा राहिला आहे. वाढत्या तापमानामुळे जलसाठय़ात वेगात घट होणार आहे. जिल्ह्य़ातील तोतलाडोह प्रकल्पात ५० टक्के, कामठी खैरी प्रकल्पात ४५, रामटेक २७, नांद वणा २ आणि वडगाव प्रकल्पात ४० टक्के साठा आहे. जिल्ह्य़ातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये ७१७ द.ल.घ.मी., मध्यम प्रकल्पांमध्ये ५१ द.ल.घ.मी. आणि लघु प्रकल्पांमध्ये ३६ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा आहे. होळीपासून मृग नक्षत्र सुरू होईपर्यंत जिल्ह्य़ाचे तापमानही चांगलेच वाढलेले असते. वाढत्या तापमानामुळे जलसाठय़ाचे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होणार असल्याने प्रकल्पातील साठा कमी होईल आणि पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे. जिल्ह्य़ातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने काही उपाययोजना आखल्या आहेत. जानेवारी ते मार्च २०१३ या कालावधीसाठी आराखडय़ामध्ये ४१२ गावांमध्ये ६२० उपाययोजनांसाठी ३ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. तर एप्रिल ते जून २०१३ या कालावधीसाठी आराखडय़ामध्ये ३५८ गावांमध्ये ४५० उपाययोजनांसाठी २ कोटी १३ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेने आतापर्यंतच्या तीन भागांमध्ये ७७१ गावांना १०७२ उपाययोजनांसाठी ५ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ या कालावधीसाठी ६० हजार रुपयांची तरतूद केली होती.
पाणीटंचाई निवारणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्य़ात ५० ट्रँकरने पाणीपुरवठा व २१९ खासगी विहिरींच्या अधिग्रहण करण्याला मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षी टंचाईग्रस्त गावांना ३१ ट्रँकरने तर २०१०-११ मध्ये २० ट्रँकरने जिल्ह्य़ात पाणीपुरवठा करण्यात आला होता. कुही तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त तीन गावांसाठी तीन विहिरी तर नागपूर तालुक्यातील टंचाईग्रस्त पाच गावांसाठी सहा विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्य़ात पाचशेवर गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. हिंगणा, काटोल व पारशिवनी तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्याची समस्या आहे. परिसरातील भूजल पातळी ९ मीटपर्यंत खोल गेल्याचे केंद्रीय भूमी जल मंडळाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. शहरांच्या पाणी पुरवठा योजनाही धरणांवरच अवलंबून आहेत. धरणांमधील पाणी झपाटय़ाने कमी होत असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी काटकसर करावी लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2013 रोजी प्रकाशित
नागपूर जिल्ह्य़ात पाणी कपातीचे संकट
जिल्ह्य़ातील जलसाठय़ात झपाटय़ाने घट होत असल्याने उन्हाळ्यातील जलसंकटाची चाहूल लागली आहे. लघु प्रकल्पांमधून शहरे आणि खेडय़ांची तहान भागवली जाते.

First published on: 16-03-2013 at 03:36 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water cut adversity in nagpur district