गेल्या अडीच महिन्यांत मध्य रेल्वेमार्गावर आठ वेळा गाडय़ा रूळांवरून घसरण्याच्या घटना घडल्यानंतर आता या घटनांमागची कारणे पुढे येऊ लागली आहेत. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, डोंबिवली आणि कल्याण या तिन्ही ठिकाणी घडलेल्या घटना वेगवेगळ्या कारणांमुळे घडल्या आहेत. यात तीव्र वळण, रुळांच्या धातूतील फरक आणि सिमेंटचे खचलेले स्लीपर यांचा मुख्यत्वे समावेश आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे हार्बर मार्गावरील गाडी घसरण्यामागे मुंबईच्या सीएसटी यार्डात असलेले तीव्र वळण कारणीभूत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी व्यक्त केला. रेल्वेमार्गावर ८ अंशाचे वळण अत्यंत धोकादायक मानले जाते. सीएसटी यार्डातील हे वळण ७.५ अंशांचे आहे. गाडीच्या वेगाचा विचार केल्यास गाडी ताशी १५ किलोमीटरपेक्षा कमी वेगाने जात होती. तरीही ही घटना घडली. त्यामुळे या घटनेमागे तीव्र वळणच कारणीभूत असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
डोंबिवली स्थानकातून ठाकुर्लीला जाताना एक गाडी धिम्या मार्गावर घसरली होती. ही गाडी घसरण्यामागे येथे साचलेले पाणी आणि चिखल यांचा वाटा होता, असे तर्क लढवले जात होते. मात्र या घटनेमागे पाणी किंवा चिखल यांचा हात नसून खचलेले सिमेंटचे स्लीपर कारणीभूत असल्याचे समजते. याआधी रुळांखाली लाकडांचे स्लीपर वापरले जात होते. मात्र लाकूड खराब झाल्यास रूळ सरकून दोन रूळांमधील अंतर कमीजास्त होण्याच्या घटना घडत. त्यामुळे गाडय़ा रूळांवरून घसरत होत्या. लाकडी स्लीपरची जागा आता सिमेंट स्लीपरने घेतली आहे. मात्र डोंबिवली स्थानकातील हा सिमेंटचा स्लीपरही खचल्याने दोन रूळांमधील जागा वाढली आणि गाडी घसरली असावी, असे निगम यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच कल्याण येथे झालेल्या घटनेत रुळाला खालच्या बाजूने तडा गेल्याचे निदर्शनास आले होते. या रुळाचा एक तुकडा परळ येथील धातू परीक्षण प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या रुळाबाबतचा अहवाल काही दिवसांतच बाहेर येईल. मात्र ही दुर्घटना धातूमध्ये असलेल्या फरकामुळेच झाली असावी, असा अंदाज खुद्द रेल्वेचे महाव्यवस्थापक व्यक्त करत आहेत. रूळांमध्ये धातूंचे प्रमाण विशिष्ट असावे लागते. या रुळात ते तसे होते का, याची चाचणी करण्यात येत असल्याचे महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Nov 2014 रोजी प्रकाशित
गाडय़ा का घसरतात?
गेल्या अडीच महिन्यांत मध्य रेल्वेमार्गावर आठ वेळा गाडय़ा रूळांवरून घसरण्याच्या घटना घडल्यानंतर आता या घटनांमागची कारणे पुढे येऊ लागली आहेत.
First published on: 05-11-2014 at 07:13 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why railway trains slip