जगातील रानम्हशींचे अस्तित्व धोक्यात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली असून नागपुरात सोमवारपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत पहिल्यांदाच वन विभाग आणि स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी रानम्हशी संवर्धनाच्या मुद्दय़ावर एकत्र आले. रानम्हशींच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने छत्तीसगडच्या सीमेवरील कोलमराका आणि कोपेला ही दोन नवी खास अभयारण्ये घोषित करण्याची सूचना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने केली असून कार्यशाळेच्या निमित्ताने रानम्हशी संरक्षणाची नवी कृती योजना पहिल्यांदाच अंमलात येणार आहे. 
हत्ती आणि गेंडा यांच्यानंतर रानम्हशी हा पृथ्वीतलावरील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक शक्तिशाली आणि सर्वात लांब शिंगे असलेला सस्तन प्राणी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रानम्हशींचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर असताना याच्या संवर्धनाकडे भारतात साफ दुर्लक्ष झाले. आययुसीएनने आंतरराष्ट्रीय वन्यजीवांच्या यादीतील रानम्हशींना लाल सूचीत समाविष्ट केल्यानंतर याचे गांभीर्य वन विभागाला जाणवले.
भारतात आसाम, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, ओरिसा आणि महाराष्ट्राच्या काही भागात रानम्हशी शिल्लक राहिल्या आहेत. पारंपरिक शिकार, जंगलांचा ऱ्हास आणि रानम्हशींच्या मूळ प्रजातीचा गावठी म्हशींसोबत होत असलेला संयोग ही रानम्हशींची शुद्ध प्रजाती नष्ट होण्यामागची कारणे आहेत. रानम्हशींची जगातील अंदाजित संख्या ४ हजार असून यातील ९० टक्के रानम्हशी भारतात आहेत.
महाराष्ट्रात छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या कोलमराका आणि कोपेला भागात गेल्या काही वर्षांपासून रानम्हशी दिसून येत आहेत. रानम्हशींच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने महाराष्ट्र सरकारला रानम्हशींच्या संरक्षणासाठी कोलमारा आणि कोपेला हा भाग अभयारण्य म्हणून घोषित करण्याची सूचना केली आहे.
सद्यस्थितीत मध्य भारतातील रानम्हशींच्या फक्त दोनच प्रजाती संरक्षित क्षेत्रात आहेत. उदांती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प (छत्तीसगड) आणि प्रस्तावित कोलमरका अभयारण्य हे दोन जंगलप्रदेश रानम्हशींच्या शुद्ध प्रजननासाठी उत्कृष्ट समजले जात आहेत. रानम्हशींची निगा राखली जाण्याच्या दृष्टीने वन्यजीव व्यवस्थापन राबविण्यावर भर दिला जाणार असून यासाठी उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे वाईल्ड लाईफ इंस्टिटय़ूट ऑफ इंडियाचे एम.के. रणजितसिंग यांनी सांगितले.
आयुसीएन/एसएससीचे रानम्हशी अभ्यासक डॉ. जेम्स बर्टन यांनी जगभरातील संवर्धनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे स्पष्ट करतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवर याची पाहिजे तशी दखल घेण्यात आली नसल्याची खंत व्यक्त केली.
भारत, नेपाळ, पाकिस्तान, भूतान आणि थायलंडमध्ये मोजक्या संख्येने रानम्हशी शिल्लक आहेत. भारतात १९३० ते १९५० या ५० वर्षांच्या कालखंडात मध्य भारतात बहुसंख्येने रानम्हशी दिसून येत होत्या. ही संख्या नंतर झपाटय़ाने कमी होत गेली. सद्यस्थितीत रानम्हशींचे कळप आसामच्या जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात बहुसंख्येने आढळून येते.
ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या १४०० असावी. रानम्हशी हे वाघांचे आवडीचे भक्ष्य आहे. रानम्हशींची संख्या कमी झाल्याने वाघांच्या भक्ष्यांच्या संख्येतही घट झाली आहे. गवताळ प्रदेशातील नैसर्गिक साखळीत रानम्हशींचे अस्तित्व अत्यंत मूल्यवान समजले जाते. गावठी म्हशींच्या प्रजातींशी संयोग घडवून आणल्याने रानम्हशींची शुद्ध प्रजाती धोक्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रानम्हशींची जगातील अंदाजित संख्या ४ हजार असून यातील ९० टक्के रानम्हशी भारतात आहेत. महाराष्ट्रात छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या कोलमराका आणि कोपेला भागात गेल्या काही वर्षांपासून रानम्हशी दिसून येत आहेत. रानम्हशींच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने महाराष्ट्र सरकारला रानम्हशींच्या संरक्षणासाठी कोलमारा आणि कोपेला हा भाग अभयारण्य म्हणून घोषित करण्याची सूचना केली आहे.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wild buffaloes existence is in danger