आगामी २०१४ च्या निवडणुका बघता राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात संघटनात्मक बांधणी दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून उद्या, शनिवारी दुपारी १२ वाजता शनिवारी भव्य युवती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातील युवतींना राष्ट्रवादीच्या पाठिशी उभे करण्यासाठी जिल्ह्य़ा जिल्ह्य़ांचे दौरे करणाऱ्या शरद पवारांच्या कन्या व पक्षाच्या ‘लोकप्रिय’ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती मेळाव्याचे आकर्षण असल्याने याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. आज सायंकाळनंतर नागपुरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उद्या सकाळपर्यंत असेच पावसाळी वातावरण राहणार का या चिंतेने राष्ट्रवादीचे नेते ग्रासले आहेत. मात्र, मेळावा बंदिस्त स्टेडियममध्ये होणार असल्याने प्रतिसाद अपेक्षनुसार राहील आणि फारशी चिंता करण्याची गरज नाही, असाही एक मतप्रवाह आहे.
कोराडी मार्गावरच्या मानकापूर भागातील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याची कार्यकर्त्यांंनी जय्यत तयारी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचे सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्या ९.१५ वाजता सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूमध्ये यशस्विनी सामाजिक अभियानातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निर्भय महिला व युवतीच्या स्वरक्षणार्थ प्रशिक्षण शिबिरात भेट देणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता  गणेशपेठमधील पक्षाच्या कार्यालयात जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता क्रीडा संकुलात होणाऱ्या मेळाव्यात त्यांचे प्रमुख भाषण होणार आहे. या मेळाव्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहतील. मेळाव्याला होणारी गर्दी नागपुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संघटनात्मक ताकदीचे मूल्यमापन करणारी राहील. महिलांची गर्दी जमविण्याच्या प्रयत्नात शहराध्यक्ष अजय पाटील, मंत्री अनिल देशमुख, फौजिया खान यांचा चांगलाच कस लागला आहे.
महिलांमध्ये जागृती निर्माण करणे, महिलांचे हक्क व अधिकार, आरक्षण, राजकारणात महिलांचा सहभाग वाढविणे आदी विषयांवर सुप्रिया सुळे संवाद साधणार आहे. सहा महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये यापूर्वी राष्ट्रवादीचा युवती मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याला युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. विदर्भात अमरावती, चंद्रपूर, अकोला, गोंदिया या शहरात झालेल्या युवती मेळाव्यांनीही गर्दी खेचली होती. या पाश्र्वभूमीवर नागपुरात होणारा उद्या होत असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्याकडे राष्ट्रवादीचे शक्तिीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, सलील देशमुख तसेच  शहर अध्यक्ष अजय पाटील, नगरसेविका प्रगती पाटील यांनी मेळाव्याला अपेक्षित गर्दी जमविण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून कार्यकर्त्यांना कामाला भिडवले होते.  
गेल्या दोन महिन्यापासून मेहनत घेत आहे. मेळाव्याला जास्तीत जास्त युवतींनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens conference in rainy weather by supriya sule