वास्तुरचनाकार उरले नावापुरते
 आता अभियंत्यांची चलती!
टेबलाखालचा दर चौरस फुटानुसार
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास चटई क्षेत्रफळाचे मोठय़ा प्रमाणावर वितरण होत असल्यामुळे त्यातून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या मलिदय़ावर सर्वाचेच लक्ष होते. परंतु त्यात अखेर अभियंता विभागाने बाजी मारली आहे. चटई क्षेत्रफळाचे संपूर्ण वितरण आता कार्यकारी अभियंत्यांकडे एकवटले गेले आहे. वास्तुरचनाकार विभाग फक्त अभिन्यासापुरते मर्यादित राहिल्याने पुनर्विकासाचे वाटोळे झाले आहे.
राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याकडे अधिकार नाहीत आणि गृहनिर्माण खात्याचा कार्यभार आपल्याकडे घेऊन ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, याचा पुरेपूर फायदा ‘म्हाडा’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उचलला आहे. पुनर्विकासासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा सोयीचा अर्थ लावून मर्जीतील कार्यकारी अभियंत्याला त्यांनी प्रमुख बनवून टाकले आहे. वास्तविक वास्तुरचनाकार विभाग आणि चटई क्षेत्रफळाचे वितरण असा परस्परसंबंध असतो आणि तो तांत्रिकदृष्टय़ाही योग्य असतानाही अभियंत्यांवर ही जबाबदारी सोपविण्यामागे वेगळ्याच आर्थिक गणिताची जोरदार चर्चा सध्या ‘म्हाडा’त सुरू आहे.
‘म्हाडा’ इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रस्तावांची छाननी वास्तुरचनाकार विभागाकडून काढून घेऊन ती नव्याने स्थापन करण्यात आलेल्या निवासी कार्यकारी अभियंत्याच्या कक्षाकडे सोपविण्यात आली आहे. ‘म्हाडा’ कायद्यानुसार कार्यकारी अभियंत्याच्या अखत्यारीत प्रस्तावांची छाननी येत नाही. त्यासाठी वास्तुरचनाकार विभाग असे नमूद करण्यात आलेले आहे. या कक्षात कनिष्ठ दर्जाचे वास्तुरचनाकार नेमून एक प्रकारे सर्वाधिकार अभियंत्यांकडेच सोपविल्याचे दिसून येत आहे.
मुंबई मंडळाच्या वांद्रे येथील कार्यालयात इतर वसाहतीनिहाय कार्यकारी अभियंते असतानाही सदर निवासी कार्यकारी अभियंता मुंबईतील सर्व वसाहतींच्या पुनर्विकास प्रस्तावांची वास्तुरचनाकारांच्या दृष्टिकोनातून विकास नियंत्रण नियमावलीनुसार म्हणे छाननी करणार आहे.
हे काम सदर कार्यकारी अभियंत्यावर सोपविल्यामुळे मुख्य वास्तुरचनाकारांनी आक्षेप घेतला. परंतु ‘म्हाडा’तील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे त्यांच्या आक्षेपाला अर्थ उरला नाही. मात्र अभियंत्यांची कुवत आणि विकास नियंत्रण नियमावलीचे ज्ञान पाहता पुनर्विकासाचे प्रस्ताव प्रलंबित राहण्याची शक्यताच अधिक आहे.
खासगी वास्तुरचनाकारांचे फावणार
नव्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, संस्थांच्या वास्तुरचनाकारांनी सादर केलेल्या नकाशात ‘म्हाडा’ इमारतींचे नियोजन व बांधकाम क्षेत्र, पुनर्विकास इमारतीचे बांधकाम क्षेत्र, विकासकाचे बांधकाम क्षेत्र आदींची छाननी महत्त्वाची असल्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंत्याच्या जबाबदारीत नसलेले आणि सदर कामाचा अनुभव नसल्याने हे प्रस्ताव कितपत योग्य पद्धतीने हाताळले जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यात अर्थकारण असल्यामुळे या खासगी वास्तुरचनाकारांचे फावणार आहे. चौरस फुटांनुसार दर दिले तर प्रस्ताव मंजूर करायचे इतकेच महत्त्व राहणार असून भविष्यात त्याचा फटका म्हाडावासीयांना बसण्याची शक्यता आहे.
मुख्य अधिकारीपदाचे अवमूल्यन
‘म्हाडा’च्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा मुख्याधिकारी कार्यकारी अभियंत्यांच्या केबिनमध्ये स्वत:हून जात असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक मुख्याधिकारी आपल्या केबिनमध्ये अभियंत्यांना बोलावून घेत असतो. परंतु निरंजनकुमार सुधांशू पुनर्विकास कक्षाचे प्रमुख रामा मिटकर यांच्या केबिनमध्ये वेळोवेळी आढळून आले आहेत. या पद्धतीमुळे मुख्याधिकाऱ्यांऐवजी पुनर्विकास कक्षाचे महत्त्व सध्या ‘म्हाडा’त भलतेच वाढले आहे. त्याचा पुरेपूर फायदा एक उपअभियंता घेत असून त्यांनी खंडणीवसुली सुरू केली आहे.