नाले, रस्ते, बांधकामांसह दलितवस्ती व मास क्षेत्र विकासावर भर
यवतमाळ पालिकेचे २०१२-१३ सुधारित आणि २०१३-१४ चे १८ कोटी ९० लाख रुपये शिलकीचे अनुमानित अंदाजपत्रक नगराध्यक्ष योगेश गढीया यांनी सभागृहात सादर केले. या अंदाजपत्रकाला सभागृहाने मंजुरी दिली. यावेळी पालिका उपाध्यक्ष जगदीश वाधवाणी, विरोधी पक्षनेते व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी तसेच मुख्याधिकारी राजेश मोहिते प्रामुख्याने उपस्थित होते.
या अंदाजपत्रकात ७९ कोटी ०३ लाख रुपयांचे उत्पन्न पालिकेला अपेक्षित असून विविध योजनांवर ५२ कोटी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
मालमत्ता करापासून ६७ कोटी, वृक्षकरापासून १० लाख तर जाहिरात व शहरात लागणाऱ्या वेगवेगळय़ा फलकांपासून ६ लाख रुपये असे ६८ कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला अपेक्षित आहे. मालमत्ता व सेवा कराच्या माध्यमातून ११ कोटी ९० लाख रुपये, विविध शासकीय अनुदानातून २६ कोटी रुपये इतर संकीर्ण उत्पन्न ६७ लाख रुपये व सुरवातीची शिल्लक ३५ कोटी अशा प्रकारे ७१ कोटींचे उत्पन्न पालिकेस अपेक्षित आहे.
अग्निशमक, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, नाली सफाई, पर्यवेक्षण आस्थापना, सार्वजनिक उद्याने बांधकामे, शिक्षण या बाबींवर तसेच स्थानिक संस्थांना अनुदाने, घनकचरा व्यवस्थापन, संत गाडगेबाबा अभियानांतर्गत एकूण महसुली खर्च २४ कोटी अनुदानित करण्यात आला आहे.
भांडवली व विकास कामांतर्गत नाली बांधकाम, रस्ते बांधकाम, नाटय़गृह बांधकाम, आययूडीपी, आयएचएसडी, शिवाजी महाराजांचा पुतळा, विकास योनजेंतर्गत जागा संपादन, मलनिस्सारण, दलित वस्ती सुधार योजना, मागासक्षेत्र विकास योजना, नागरी दलित वस्तीत पाणीपुरवठा आदी बाबींवर २६ कोटी ४० लाख रुपये खर्च आयोजित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन भरती प्रक्रिया मेमध्ये
रस्ते निर्मिती खर्चात दीड कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. व नाली बांधकामामध्ये ७० लाखांचे तर नियोजनात ५० लाखांची वाढ हे आजच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्टय़ असल्याचे मुख्याधिकारी मोहिते यांनी सांगितले.
पालिकेत ९८ पदे रिक्त असून ६६ कर्मचारी आहे. उर्वरित पदांकरिता येत्या मे महिन्यात भरती प्रक्रिया जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येईल, असेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
 १५ वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे. सफई कामगारांची संख्या १७५ आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मासिक ७० लाख रुपये खर्च होतो.
 पालिका शाळांमध्ये कार्यरत १७८ शिक्षकांच्या वेतनावर पालिकेच्या रेषोप्रमाणे २०लाख रुपये मासिक खर्च होतात.
शहरातील बगिचे बीओटी तत्वावर देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. शहराचा पर्यावरण अहवाल नागपूरच्या ग्लोबल सिस्टमतर्फे बनविण्यात आला आहे. त्यावर पाच लाखांचा खर्च झाल्याची माहितीही उपस्थितीत अधिकाऱ्यांनी दिली.
अंदाजपत्रक फसवे – बाळासाहेब चौधरी
पालिका सदस्यांसमोर सादर करण्यात आलेले अंदाजपत्रक फसवे असून पालिकेला  आर्थिक संकटात टाकणारे आहे, असा आरोप माजी नगराध्यक्ष व विद्यमान विरोधी पक्षनेते बाळासाहेब चौधरी यांनी सभागृहात चच्रेदरम्यान केला. पालिकेने आवश्यक बाबींवर अनावश्यक खर्च केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शहरातील स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठय़ाकडे लक्ष देण्याऐवजी कचऱ्याच्या कंत्राटावर तब्बल २.५० कोटी रुपये खर्च करण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करून माझ्या कार्यकाळात हा खर्च ८० लाखांच्या वर गेला नव्हता आणि तरीदेखील पालिकेच्या उत्पन्नातूनच हा खर्च व्हायचा.
आरोप बिनबुडाचे -नगराध्यक्ष योगेश गढीया
अंदाजपत्रकावर विरोधकांनी केलेली टीका अनाठायी असून त्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. कोणत्याही प्रकारे अवास्तव खर्च पालिका करीत नसून नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी पालिकेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी राजेश मोहिते व इतर अधिकारी रात्रंदिवस झटत असतो, असे प्रतिपादन अंदाजपत्रकीय बठक संपल्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष योगेश गढीया व उपाध्यक्ष जगदीश वाधवाणी यांनी केले.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal corporation 18 19 crores budget