निरनिराळ्या बदलांमुळे २०१५ हे कॅलेंडर आणि २०१५-१६ हे आर्थिक वर्ष भारतीय प्रवासी वाहन क्षेत्रासाठी अत्यंत वेगवान घडामोडींचे गेले. ग्रेटर नॉएडातील आंतरराष्ट्रीय वाहन प्रदर्शन आणि दसरा-दिवाळीनिमित्ताने निवडक नव्या मॉडेलची रेलचेल हे या उद्योगासाठी काही प्रमाणात उत्साह निर्माण करणारे घटक ठरलेही. मात्र नवा कालावधी वाहन उद्योगासाठी आव्हानात्मक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्कायमेट या आंतरराष्ट्रीय वेधशाळेबरोबरच भारतीय वेधशाळेनेही यंदाच्या मान्सूनबाबत आशादायक अंदाज वर्तविला आहे. सरासरी पावसाचे प्रमाण १०० टक्क्यांवर अंदाजित करण्यात आले आहे.
याशिवाय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी ग्राहकांच्या क्रयशक्तीला पूरक ठरणार आहे. मान्सूनची साथ आणि हाती येणाऱ्या अधिकच्या पैशाचा विनियोग वाहन खरेदीकरिता होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षांत आर्थिक-निर्मिती उद्योगावरील मंदी आणि चेन्नईतील सुनामी, हरियाणातील आरक्षण आंदोलन याचा फटका भारतीय वाहन उद्योगाला बसला. या बिकट परिस्थितीतही मावळलेल्या आर्थिक वर्षांत तुलनेत देशातील प्रवासी वाहन क्षेत्राने उल्लेखनीय कामगिरी केली.
आर्थिक वर्षांतील प्रवासी कार विक्रीचे ७.८७ टक्के वाढीचे प्रमाण हे गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम ठरले. मात्र चालू आर्थिक वर्षांचा अंदाज अवघा ६ ते ८ टक्के वाढीचा अभिप्रेत करण्यात आला आहे. नव्या वर्षांपासून लागू होत असलेल्या जाचक अटींमुळे हा अंदाज यंदा खुंटविण्यात आला आहे.
एक म्हणजे नव्या आर्थिक वर्षांपासून विविध गटातील प्रवासी वाहनांवर इंधन अधिभार शुल्क लागू करण्यात आले आहे. त्यातच नवी दिल्ली परिसरात २००० सीसी इंजिन क्षमतेपेक्षा अधिकच्या डिझेल वाहनांच्या विक्रीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षांच्या अखेरीसच्या अर्थप्रगतीने काहीशा आशा या क्षेत्राच्या वेगाबाबत निर्माण झाल्या आहेत. मार्च २०१६ मधील महागाईचा दर पुन्हा एकदा ५ टक्क्यांखाली विसावला आहे. तर फेब्रुवारी २०१६ मधील देशाचे उद्योग उत्पादनही २ टक्क्यांवर गेले आहे.

सादरीकरणानंतर नव्या सहा मॉडेलनाच प्रतिसाद
नुकत्याच संपलेल्या २०१५-१६ या आर्थिक वर्षांत विविध वाहन उत्पादक कंपन्यांची २० ते २४ वाहने भारतीय बाजारपेठेत दाखल झाली. मात्र त्यातील केवळ सहाएक मॉडेलना प्रतिसाद मिळाला. वाहन सादर केल्यापासून महिन्याला सरासरी ३,००० वाहने विकली जाण्याचे प्रमाण अवघ्या काही मॉडेलचेच होते. तुलनेत क्रेटाची कामगिरी उल्लेखनीय म्हणता येईल. तर महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या केयूव्ही१०० व टीयूव्ही५०० या त्या त्या गटात जम बसवू पाहत आहेत. नव्या दमाच्या रेनो क्विडलाही बऱ्यापैकी पसंती दिली जात आहे.

टाटा मोटर्स टिएगोची किंमतीने अस्वस्थता
टाटा मोटर्सने तिची झिका ही कार टिएगो या नव्या नावासह याच महिन्यात सादर केली. ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर बाजारात आलेल्या या वाहनाने जुन्या नकारात्मक आठवणी पुसून काढताना तिच्या किंमतीच चर्चा बाजारात अधिक कशी होईल, हे पाहिले. टिएगोची ३.२५ लाख रुपयांपासून सुरुवात होणारी किंमत प्रवासी वाहनाच्या या गटात अस्वस्थ करणारी आहे. स्पर्धक मारुती सुझुकीच्या सेलेरियो आणि ह्युंदाईच्या आय१० पेक्षा नवी टिएगो ४० हजार रुपयांपर्यंत स्वस्त पडते.
वीरेंद्र तळेगावकर – veerendra.talegaonkar @expressindia.com

मराठीतील सर्व व्हीलड्राइव्ह बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coming period challenging for the automobile industry