चॉकलेट आवडत नाही अशा मुली किंवा स्त्रिया अगदीच थोड्या असतील. तुम्ही कितीही वाईट मूडमध्ये असलात तरी एखादं चॉकलेट खाल्लं की तुमचा मूड बदलू शकतो. पिरीयड्सच्या दरम्यान तर अनेकींना चॉकलेटचं क्रेव्हिंग होतं. काहीजणी तर स्ट्रेसबस्टर म्हणूनही चॉकलेट खातात. डार्क चॉकलेट तर डाएटसाठीही उपयुक्त आहे असं म्हटलं जातं. अर्थात खूप जास्त साखर असलेली चॉकलेट्स खाणं किंवा खूप जास्त चॉकलेट्स खाणंही आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे. पण मूड छान करण्यासाठी किंवा ‘फील गुड’साठी चॉकलेटचा उपयोग होतो. चॉकलेटबद्दल आणखी फील गुड वाटायला लावणारी गोष्ट माहीत आहे? चॉकलेट स्कीनसाठीही तितकंच चांगलं असतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- शी इज अनस्टॉपेबल : भारतीय नौदलातील महिलांची अनोखी जनजागृती मोहीम

चमकदार त्वचेसाठी, चेहऱ्यावरचे पिग्मेंटेशनचे मार्क्स कमी करण्यासाठी, चेहऱ्यावरचा ग्लो वाढवण्यासाठी, मुरूम किंवा अॅक्ने कमी करण्यासाठी चॉकलेट मास्क चेहऱ्याला लावणं फायदेशीर आहे. एखाद्या विकएण्डला मस्त चॉकलेट चघळत हा चॉकलेटी मास्क तुम्ही घरीही करु शकता. स्कीनसाठी डार्क चॉकलेट सगळ्यात चांगलं असतं असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. तसंच कोको पावडरही चेहऱ्यासाठी गुणकारी असते असं म्हटलं जातं. त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरच्या पेशींची झीज होण्यापासून रोखतात. त्यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात. डार्क चॉकलेटमधील झिंक मऊसूत आणि नितळ त्वचेसाठी फायदेशीर असतं असं तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा- चॉइस तर आपलाच : घरातले लोक असं का वागतात?

चला तर मग बघूया, चॉकलेटी फेस मास्क आणि त्याचे फायदे-

ओट्स आणि चॉकलेट फेस मास्क

कोको पावडर, ओट्स, थोडं क्रीम आणि मध हे सगळं एकत्र करून चांगलं मिक्स करा. यात अजिबात गुठळी राहू देऊ नका. हा पॅक चेहऱ्यावर १५-२० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका. या पॅकमुळे चेहऱ्यावर ग्लो येईल आणि ब्लॅकहेड्स असतील तर तेही कमी होतील.ड्राय स्कीनसाठी हा पॅक चांगला आहे.

डार्क चॉकलेट आणि मध

डार्क चॉकलेट वितळून घ्या. एका बाऊलमध्ये वितळवलेलं डार्क चॉकलेट घ्या आणि त्यात मध घालून एकत्र करा. चेहरा आधी स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतरच ही पेस्ट चेहऱ्यावर समान लावा. पॅक पूर्ण सुकला की मगच साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका. या पॅकमुळे चेहऱ्याची त्वचा चमकदार बनते.

हेही वाचा- स्पेनचा ऐतिहासिक निर्णय! मासिक पाळीच्या काळात सुट्टी देणारा ठरला पहिला युरोपियन देश

चॉकलेट आणि दही

एक चमचा वितळलेल्या चॉकलेटमध्ये एक चमचा दही आणि एक चमचा बेसन घालून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर मास्कसारखी लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन टाका. चेहऱ्यावरची डेड स्कीन आणि टॅनिंग कमी करण्यासाठी या मास्कचा चांगला उपयोग होतो.

चॉकलेट आणि फ्रूट मास्क

एका ब्लेंडरमध्ये कोको पावडर किंवा मेल्टेड म्हणजे वितळवलेले डार्क चॉकलेट घ्या. त्यात स्ट्रॉबेरी ,केळं आणि संत्र्याच्या फोडी घालून ते एकत्र चांगलं ब्लेंड करा. हा मास्क चेहऱ्यावर लावा आणि ५ मिनिटे हाताने चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर२० मिनिटे मास्क तसाच राहू दे. मास्क सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाका. हा मास्क आठवड्यातून दोनदाही लावू शकता. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

हेह वाचा- WPL Auction: कोणी घर घेणार तर कोणी कर्ज फेडणार! छोट्या लेकींची मोठी स्वप्ने होणार साकार, WPLने आयुष्य होणार प्रकाशमान

कोको ई व्हिटॅमिन मास्क

एका बाऊलमध्ये ई व्हिटॅमिनच्या कॅप्सुलमधील लिक्विड काढून घ्या. त्यात कोको पावडर, मध आणि दही घालून एकत्र पेस्ट करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका. तुमची त्वचा निस्तेज असेल तर हा मास्क आठवड्यातून दोनदा लावा. यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते

चॉकलेट आणि ब्राऊन शुगर मास्क

चॉकलेटमध्ये ब्राऊन शुगर आणि थोडंसं दूध घाला. एकत्र करून दाट मिश्रण तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुऊन टाका. या मास्कमुळे त्वचेवरील डेड स्कीन जाण्यास मदत होते. चेहऱ्यावर मस्त ग्लो येतो.

चॉकलेट आणि मुलतानी माती पॅक

दोन चमचे मेल्टेड चॉकलेट किंवा कोको पावडर घ्या. त्यात तीन चमचे गुलाबपाणी घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावा. सुकल्यानंतर धुऊन टाका. तुम्हाला हवं असल्यास या पेस्टमध्ये एक किंवा अर्धे केळे स्मॅश करून घालू शकता. यामुळे टॅनिंग तर जातंच पण लूज पडलेली स्कीन टाईट करण्यासाठीही या मास्कचा उपयोग होतो. ऑईली स्कीनसाठी हा मास्क फायदेशीर आहे.

हेही वाचा- WPL Auction 2023: विश्वचषक विजेती शफाली वर्मा मालामाल; दिल्लीने लावली करोडोंची बोली

चॉकलेट अक्रोड मास्क

एक चमचा कोको पावडरमध्ये २ चमचे अक्रोड पावडर घाला. त्यात ३ चमचे दूध आणि १ चमचा खोबऱ्याचं तेल घालून चांगलं मिक्स करा. चेहरा स्वच्छ करून हा फेस मास्क लावा. लक्षात ठेवा हा मास्क डोळे आणि ओठांवर लावू नका. १५ मिनिटे मास्क तसाच राहू दे. त्यानंतर चेहऱ्यावर हाताने सर्क्युलर मोशनमध्ये थोडं रब करा. यामुळे चेहऱ्यावरील मास्क निघेल. मास्क हाताने पूर्ण काढून टाका आणि साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका. यामुले डेड स्कीनन जाण्याबरोबरच चेहरा नितळही होईल.

आपल्याला कुणी चॉकलेट दिलं की चेहऱ्यावर आनंद दिसतो ना, अगदी तसंच चॉकलेट फेस मास्कमुळे आपली स्कीनही आनंदी आणि उत्साही दिसते. तर, मग या विकएण्डला नक्की ट्राय करा हे चॉकलेट मास्क!

(शब्दांकन : केतकी जोशी)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chocolate not only makes the mind feel good but also good for skin