रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा आगामी चित्रपट सध्या समाजमाध्यमांवर खूप चर्चेत आहे. या चित्रपटातलं पहिलं गाणं- ‘आयटम साँग’ गुरुवारी यूट्यूबवर प्रदर्शित झालं आणि इन्स्टाग्रॅम व ट्विटरवर नेटिझन्सच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘वा नु कावालया’ (Vaa Nu Kaavaalaa) असे तमिळ-तेलुगू मिश्र बोल आणि ‘रॉकस्टार’ संगीतकार अनिरुद्धचं कॅची संगीत असलेल्या या गाण्यात तमन्ना भाटिया ‘वक्का वक्का’ म्हणणाऱ्या शकीरासारख्या पेहरावात कमनीय बांधा आणि उत्तम नृत्यकौशल्य दाखवते. इथपर्यंत सर्वकाही ठीक चाललं होतं, पण गाण्याच्या दुसऱ्या कडव्यात तमन्नाच्या शेजारी पदन्यास करण्यासाठी रजनीकांत यांची ‘एन्ट्री’ झाली, त्यांनी गॉगल डोळ्यांवर ठेवण्याची आपली लोकप्रिय अदाही करून दाखवली आणि या पाँईंटला नेटिझन प्रेक्षकांचे अक्षरश: दोन गट पडले!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तमन्ना एकटी बरी होती. हे आजोबा कशाला हवेत शेजारी नाचायला?’ असं काहीजण म्हणू लागले. काहींनी दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांना उद्देशून ‘हे काय करून ठेवलंय?’ असं विचारायला सुरुवात केली. अशा कमेंट्स करणाऱ्या मंडळींशी ‘थलैवर रजनीकांत’च्या फॅन्सची जुंपली आणि ‘कमेंटस्-कमेंटस्’चा खेळ रंगला! अर्थातच ‘ ‘थलैवर’ची या वयातही काय बाप स्टाईल आहे!’ छापाच्या कमेंट्स भारी पडल्या. या प्रकरणात अधोरेखित झालं ते एवढंच, की आपल्या ‘मेनस्ट्रीम’ सिनेमांमध्ये हीरो ७२ वर्षांचा असला, तरी हिरोईन किंवा ‘आयटम गर्ल’ विशीतलीच (फारतर नुकतीच तिशीत पदार्पण केलेली) लागते!

हेही वाचा – टोमॅटोचे दर गगनाला… तुम्हाला सुचतोय का पर्याय?

अगदी ताजी गोष्ट- ‘टीकू वेडस् शेरू’ या कंगना रणौतची निर्मिती असलेल्या चित्रपटात २१ वर्षांची अभिनेत्री अवनीत कौर हिच्याबरोबर ४९ वर्षांच्या नवाजुद्दीन सिद्दिकीची जोडी जमवल्यावरून अशीच चर्चा समाजमाध्यमांवर झाली होती. काहीच दिवसांपूर्वी तेलुगू चित्रपट ‘वॉल्टर वीरैय्या’मध्ये ६७ वर्षांच्या चिरंजीवींबरोबर आणि ‘वीर सिम्हा रेड्डी’ चित्रपटातही ६३ वर्षांच्या नंदामुरी बालकृष्ण यांच्याबरोबर ३७ वर्षांची श्रृती हसन नाचताना दिसली, तेव्हाही नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मेनस्ट्रीम हिंदीतही हाच कित्ता आहे. अलीकडच्या काळात किआरा अडवाणी, मानुषी छिल्लर, दिशा पटानी, पूजा हेगडे, या अभिनेत्री त्यांच्याहून २५ ते ३० वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यांबरोबर नायिका म्हणून काम करताना दिसल्या. किंबहुना जिथे नायक-नायिका एकमेकांना मिळत्याजुळत्या वयांचे आहेत, असे चित्रपट ‘मेनस्ट्रीम’मध्ये सध्या जवळपास नाहीतच! अर्थात हा काळाचा दोष नव्हे. ही प्रथा फार पूर्वीपासून चित्रपटसृष्टीत चालत आली आहे.

याचा अर्थ असा, की साठीतले, सत्तरीतले अभिनेते ‘हीरो’ म्हणून बॉक्स ऑफिसवर स्वीकारले जात आहेत. त्यांचं आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीबरोबर नाचणं, ‘फॅन्स’ना आवडणाऱ्या स्टाईल्स करून दाखवणं, यात काही खटकणारं आहे असं एका मोठ्या रसिकवर्गाला वाटत नाही. चाळिशी, पन्नाशीच्या नायिकांनी मात्र जरा कुठे स्विमसूटसदृश कपडे घालून फोटो अपलोड केले किंवा साध्या एखाद्या ‘रील’मध्ये नाचून दाखवलं, की ‘मॅडम, अब आप बूढी हो गई’ असं सांगणाऱ्या कमेंटस् त्या पोस्टवर आल्यास म्हणून समजा! नुकत्याच आलेल्या ‘पोन्नियिन सेल्व्हन’ भाग १ व २ या चित्रपटांमध्ये ऐश्वर्या रायनं उत्तम अभिनय करूनही तिला समाजमाध्यमांवर ‘ऐश्वर्या आँटी’ म्हणून अनेकांनी हिणवलं होतं. म्हणजे वय वाढलं की अनेकांच्या दृष्टिनं अभिनेत्रीची किंमत कमी होते!

हेही वाचा – ‘अगं कंगना, तुला नवरा कसा मिळणार?’ – कंगना रणौतच्या आईची चिंता!

‘भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनेत्री केवळ ५ वर्षं ‘टॉप’ला राहू शकते आणि नायकासाठी हा काळ १५ वर्षांचा असतो,’ असं मत एका प्रसिद्ध तमिळ अभिनेत्यानं एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. प्रत्यक्ष पाहिलं तर मात्र ‘मेनस्ट्रीम’मधले नायक सर्वच भाषांमध्ये ‘ज्येष्ठ नागरिक’ झाल्यावरही आपल्या खऱ्या वयापेक्षा कितीतरी कमी वयाच्या भूमिका करत आहेत. अभिनेत्रींसाठी मात्र मेनस्ट्रीमचा मार्ग लवकर बंद होतो. ‘ओटीटी’ व्यासपीठ आल्यापासून मोठ्या वयाच्या स्त्री-भूमिकांना महत्त्व देणारे काही चित्रपट नक्कीच निघालेत, पण त्यानं ‘मेनस्ट्रीम’मधला शिरस्ता बदलला जाणं शक्य नाही, असंच सध्या दिसतंय. तुम्हाला काय वाटतं?

(lokwomen.online@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero is 72 years old in mainstream movies the heroine is seen 20 year old ssb