फौजदारी कायद्यानुसार आरोपीचा गुन्हा सुद्धा होऊन त्याला शिक्षा होण्याकरता, त्याचे कृत्य गुन्हा ठरणे आणि ते पुराव्यानिशी सिद्ध होणे अत्यावश्यक असते. म्हणूनच फौजदारी कायद्यातील गुन्ह्यांच्या व्याख्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलेचा विनयभंग करणे हा आपल्याकडे गुन्हा आहे आणि भारतीय दंड संहितेत त्यासंबंधी सविस्तर कायदेशीर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मात्र या बाबतीतली एक महत्त्वाची कायदेशीर अडचण म्हणजे ‘विनयभंग’ या संज्ञेची ठोस व्याख्या नसणे. सतत बदलत्या सामाजिक परिस्थितीत अशी ठोस आणि कायमची व्याख्या करणे हे आव्हानात्मकच आहे. विनयभंगाची ठोस व्याख्या नसल्याने कोणती कृत्ये विनयभंग ठरतात आणि कोणती नाही हा नेहमीच वादाचा मुद्दा बनून राहिलेला आहे. साहजिकच या बाबतीत न्यायालयांना कायद्याचा अर्थ लावण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणांत त्या त्या वेळच्या परीस्थितीनुसार अमुक एखादे कृत्य विनयभंग आहे किंवा नाही, हे ठरवून तसा निकाल द्यावा लागतो.

हेही वाचा… Health allergy Special: कृत्रिम दागिन्यांच्या ॲलर्जीचे प्रकार आहेत तरी किती?

असेच एक प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात आले होते. या प्रकरणात काही महिला आणि पुरुष पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्याकरता एके ठिकाणी गेले होते. तेव्हा तेथील एका व्यक्तीने महिला पोलिसाला उद्देशून “क्या डार्लिंग, चालान काटने आयी क्या?” असे उद्गार काढले, त्याविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले आणि तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्या निकाला विरोधात करण्यात आलेले अपील देखिल फेटाळण्यात आल्याने, उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.

उच्च न्यायालयाने- १. गुन्हा आणि आरोपपत्रात गंभीर चुका असल्याचा दावा आरोपीकडून करण्यात आला, २. आरोपीने ते उद्गार विनोद म्हणून काढल्याचे पोलीस कर्मचारी असलेल्या एका साक्षीदाराने म्हटल्याकडे देखिल आरोपीने लक्ष वेधले. ३. डार्लिंग हा शब्द लैंगिक स्वरुपाचा नसल्याचा आरोपीचा दावा आहे. ४. मूळ निकाल हा सकारण आणि सविस्तर दिलेला असल्याने त्यात हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे, ५. ‘‘क्या डार्लिंग चालान काटने आयी क्या?’’ हे उद्गार विनयभंग करणारे आहेत का ? हे आधी ठरविणे आवश्यक आहे. ६. अनोळखी महिलेला, मग ती पोलीस असो किंवा नसो, डार्लिंग म्हणून संबोधणे हे निश्चितपणे लैंगिकवृत्ती प्रदर्शित करणारे आणि आक्षेपार्ह आहे. ७. आपली सध्याची सामाजिक परीस्थिती लक्षात घेता, कोणत्याही पुरुषास अनोळखी महिलेला सार्वजनिक ठिकाणी डार्लिंग म्हणून संबोधण्याची परवानगी देता येणार नाही. ८. पोलिसांनी सादर केलेले साक्षीदार आणि त्यांची साक्ष विश्वासार्ह वाटते. ९. पोलिसांनी आरोपीचा गुन्हा नि:शंकपणे सिद्ध केलेला आहे. १०. महिलेबाबत केलेले आक्षेपार्ह विधान लक्षात घेता, न्यायालयांनी आरोपीस क्षमा न करणे हे योग्यच आहे. ११. आरोपीने आक्षेपार्ह उद्गार काढले असले, तरी त्यापुढे कोणतेही अनुचित कृत्य केलेले नसल्याचादेखिल विचार करणे क्रमप्राप्त आहे, अशी निरीक्षणे नोंदविली आणि आरोपीस दोषी ठरविण्याचा निर्णय कायम करून त्याला सुनावलेली तीन महिन्यांची शिक्षा कमी करून एक महिन्याची करण्याचा निकाल दिला.

हेही वाचा… विदेशातून ‘या’ विषयात पदवीचं शिक्षण ते मॉडेलिंगमध्ये करिअर, सारा तेंडुलकरने निवडली वेगळी वाट

सध्याच्या सामाजिक परीस्थितीत अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणून संबोधण्याची परवानगी पुरुषांना देता येणार नाही हे या निकालातील निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. याच निरीक्षणाच्या आधारे, अनोळखी महिलेला डार्लिँग म्हणून संबोधणे हे कृत्य विनयभंग ठरविणारा म्हणून हा निकाल निश्चितच महत्त्वाचा आहे. या निकालाने विनयभंग संज्ञेच्या व्याख्येची व्याप्ती अजून वाढविलेली आहे.

आरोपी डार्लिंग असे संबोधण्यावरच थांबला, पुढे अजून काही दुष्कृत्य केले नाही, म्हणून त्याला सुनावलेली शिक्षा कमी करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे का ? हा मूळात एकूण शिक्षा फक्त तीन महिन्यांचीच होती, त्यातही ती शिक्षा अजून दोन महिन्यांनी कमी नसती केली तरी चालले नसते का? हे महत्त्वाचे प्रश्न या बाबातीत उपस्थित होणारच आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata high court observed in one case that to call the stranger woman darling is molestation asj