डॉ. रश्मी जोशी शेट्टी
जेव्हा क्वीन मूवीमधली रानी (कंगना राणौत ) आपला विवाह मोडल्यानंतर अतिशय हताश होते, तेव्हा तिचे मन समजून घेऊन तिचे कुटुंबीय हळुवारपणे तिला मदत करताना आपण पाहातो. यातच जेव्हा “मुझे मेरे हनीमून में अकेले जाना है”, असं वाक्य ऐकून मात्र त्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजतात आणि आपल्या चेहऱ्यावर हसू उमलते. याचे कारण म्हणजे आपल्या समाजसंस्थेच्या नियमांना झुगारून जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा समर्थक आणि आंदोलक असे दोन प्रवाह निर्माण होतात. हे एक उदाहरण देण्याचा उद्देश असा की, जेव्हा महिला स्वतः साठी लढायला तयार होते, तेव्हा आपोआपच कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक आणि समाजाला तिच्या हक्कांसाठी लढायला भाग पाडते.
आता हेच जेव्हा सिनेमात न होता आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात होते, तेव्हा आमची इज्जत जाते, मुलीला अपशकुनी म्हटले जाते. मुलीतच काहीतरी कमी असेल, जास्त शहाणी असेल, बाहेर हिचं लफडं असेल अशी अनुमाने आपण सहजरीत्या करतो. वास्तविकता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करणे आपल्याला कमी महत्वाचे वाटते. अगदी मुलगी जन्माला आल्यापासून पालकांना तिच्या भविष्याची चिंता सतावू लागते. याचे कारण म्हणजे आपली मानसिकता! मग आता जेव्हा प्रश्न स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचा येतो तेव्हा हा सामाजिक, राजकीय, आर्थिक मुद्द्यांपेक्षा वेगळा मानून त्यावर उपाय शोधणे म्हणजे खीर बनवतांना त्यात सगळे व्यंजन घालून साखर न घालण्यासारखे आहे. आता निसर्गानेच स्त्री आणि पुरुषाची रचना वेगळी केलीये. मासिक पाळी स्त्रीला येते, तीच गर्भ धारण करू शकते. जसे शारीरिकदृष्टया फरक असतात तसेच मानसिकदृष्ट्याही त्या वेगळ्या असतात. एखाद्या गोष्टीकडे स्त्रीचा बघण्याचा दृष्टीकोन, त्यामागच्या भावना पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. तेव्हा मानसिक आजारांचे स्वरूपही वेगळे असते.
हेही वाचा >> किंटसुगी : प्रेमभंगातून सावरण्याठी सुवर्ण नियम!
बहुतांश महिला मानसिक काय शारीरिक आजारसुद्धा लपवतात. याची बहुतांश कारणे आहेत. काही महिलांना असा आजार आयुष्याचा भाग असल्याच वाटतं, तर काहींना आर्थिकदृष्ट्या साथीदारावर निर्भर असल्याने, आजारावर खर्च होईल असे वाटते. काहींना आजाराबद्दल लाज वाटते. घरात समजून घेणारी लोकं नसतील तर “ही अशीच नाटकं करते” असे टोमणे ऐकायला नको म्हणूनही स्त्रिया गप्प बसतात. वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने दिलेल्या अहवालानुसार डिप्रेशन आणि अॅन्झायटीचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मासिक पाळी किंवा गर्भधारणेच्या वेळी होणारे हॅार्मोनल किंवा रासायनिक बदल. त्याबरोबरच व्यसनाधीन साथीदार, लैंगिक किंवा शारीरिक हिंसा, आर्थिक दृष्ट्या निर्बलता, घरातील दुर्धर आजार असलेल्यांची एकट्याने सेवा करणे अशी कितीतरी कारणे सांगता येतील.
स्किझोफ्रेनिया किंवा बायपोलर डिसआॅर्डरसारखे तीव्र मानसिक आजार महिलांना झाल्यास लग्नसंबंध तुटणे, त्यांना घराबाहेर काढणे असे दुर्दैवी प्रकार बऱ्याचवेळा होतात. अशात त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.
तेव्हा सगळ्यात महत्वाचे म्हणजे महिलांना शिक्षित करणे आहे. “बेटी बचाओ बेटी पढाओ” अभियानासारखेच मानसिक आरोग्यास पाठिंबा देणारे अभियान येणे गरजेचे आहे. आणि त्याची सुरुवात प्रत्येक महिलेने स्वतः करावी. आपल्या शारिरीक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची जबाबदारी घ्यावी. कारण “ यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता!”
(लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)
