सारिका चाटुफळे-कुलकर्णी
पहाटे पाहिलेली स्वप्नं पूर्ण होतात म्हणतात ते काही खोटं नाही. मागच्याच आठवड्यात शेजारच्या शिवानी वहिनी सांगत होत्या, त्यांना स्वप्न पडलंय. स्वप्नांत त्या मिलिंद सोमणबरोबर क्रिकेट खेळत आहेत. वहिनींची आणि मिलिंदची टीम जिंकली आहे. वहिनींनी मिलिंदला चहा घेण्यासाठी घरी बोलावलं आहे. त्यांनी हे सांगितलं तेव्हाच मी त्यांना म्हटलं होतं, ‘वहिनी, बघा तुमचं स्वप्न पूर्ण होतं की नाही. पहाटे पडलंय ते.’ आणि नुकतीच मिलिंद सोमणनं काळ्या विमची जाहिरात केलेली बघितली आणि मग तर खात्रीच पटली, एक कलाकार जसा हार्पिक घेऊन लोकांच्या घरी शौचालय घासायला जायचा, तसाच विमची जाहिरात करायला मिलिंद सोमण शिवानी वहिनींच्या घरी भांडी घासायला नक्की येणार. तो भांडी घासायला आल्यावर आधीच घासलेली भांडी त्याला द्यायची असंही वहिनींनी नक्की करून ठेवलंय. मग बरोबर आहे ना, आपल्या आवडत्या कलाकाराला कसं काय घाणेरडी भांडी घासायला देणार? शिवाय वहिनींना मी असंही सुचवलं आहे की खीर नाहीतर शिरा केलेली भांडीच त्याला घासायला द्या. भांड्यात गोडवा असावा, नाही का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Open Letter: अहो गृहमंत्री, लक्ष कुठे देणार? दीपिकाच्या कपड्यांकडे की हुंडाबळींच्या मोठ्या संख्येकडे?

एक लक्षात आलं की स्त्रियांचं जसं सौंदर्य क्रीम असतं तसं पुरुषांचं क्रीम बाजारात आलं, स्त्रियांसाठी खास जसे अत्तर असते तसे पुरुषांचेही वेगळे अत्तर आले, फेस वॉश, पावडर, साबण असं सगळं सगळं स्त्रियांच्या बरोबरीत येण्यासाठी पुरुषांचं वेगळं काढलं. पण काही बाबतीत स्त्रियांची बरोबरी होऊ शकणार आहे का? स्त्रिया जसा अक्कलहुशारीने एकमेकींचा मत्सर करू शकतात तसा पुरूषजातीला करता येणार आहे का? स्त्रिया जसे खोचक टोमणे मारतात तसे पुरुषांना जमणार आहेत का? बगळा कितीही पांढरा झाला तरी तो कधी हंस बनणार आहे का? विम कितीही काळ्या बाटलीत आणला तरी त्यात बायकांच्या विममधील लिंबाचा आंबटपणा येणार आहे का?

आणखी वाचा : open letter : राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजींना अनावृत पत्र… आम्ही ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या लेकी!

आता घराघरांत या काळ्या विममुळे घडणारी भांडणं मला दिसू लागलेली आहेत. घरातील भांडी घासायला स्त्री उभी आहे, तिने हातात काळा विम घेतलाय. तितक्यात तिचा मुलगा आजोबांच्या कानात काहीतरी सांगतो. आजोबा आजीच्या कानात काहीतरी सांगतात. आजी मुलाच्या कानात काहीतरी सांगते आणि मग या स्त्रीचा नवरा स्लो मोशनमध्ये धावत धावत तिथे जातो आणि तो विम हिसकावून घेतो, म्हणतो, ‘‘मै मेरा विम नही दूंगा.’ स्त्रियांनी या काळ्या बाटलीला हात जरी लावला तर त्यातून अलार्म वाजावा अशी व्यवस्था करण्याची सूचनादेखील मी विमच्या उत्पादकांना करणार आहे. ज्याच्यासाठी बनवलं आहे त्याच्या हातात उत्पादन जावं एवढाच आपला निर्मळ उद्देश. विमची काळी बाटली काढून कंपनीने थेट पुराणाशी संबंध साधला आहे. म्हणजे कृष्ण काळा होता, राम सावळा होता. ‘रात्र काळी, घागर काळी, यमुना जळे तो काळी हो माय’ अशीच अवस्था… जळलेलं भांडं काळं, त्याला घासणाऱ्या विमची बाटली काळी हो माय. काळा रंग हा पौरुषाशी निगडित असावा की काय अशी शंका येते. लग्न झाल्यानंतर पुरूषाच्या आयुष्यात फक्त अंधारच असतो असे तर या रंगातून उत्पादकाला सांगायचं नाही ना? या भांडी घासायच्या लिक्विडच्या निमित्ताने पुरुष सबलीकरणाकडे एक पाऊल पुढे सरकले याबद्दल मला आनंद वाटू लागला आहे. आता हळूहळू सगळीकडे पुरुषांच्या मुलाखती दिसू लागतील.

आणखी वाचा : तळपायांना भेगा पडतात?… मग हे करून पहा

‘या लिक्विडने भांडी घासायच्या आधी मी दु:खी होतो. भांडी घासून झाली की माझा चेहरा कोळशासारखा काळा झालेला असायचा. आता मात्र काळ्या बाटलीतील हा द्रव वापरून भांडी लख्खं झाल्यानं माझा चेहराही लख्खं झाला आहे.’ बाहेरून कितीही पुरुषप्रधान वाटत असली तरी आतून स्त्रीप्रधान असलेल्या आपल्या संस्कृतीत पुरुषांना सबळ करणारं हे उत्पादन खूपच मोलाचं आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते. काळा असला तरी आपलाच आहे तो, असे म्हणून हे उद्पादन सगळ्यांनी मनःपूर्वक स्वीकारावं. कोण जाणे, याने भांडी घासून आपला नवराही मिलिंद सोमण सारखा शक्तिशाली आणि हँडसम होईल.
sarikachatuphale.kulkarni@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milind soman black vim for men vp