मूग पचायला सोपे असे कडधान्य आहे. आयुर्वेदामध्ये पथ्यकर आहार म्हणून मूग सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. संस्कृतमध्ये ‘मूग्द’, हिंदीमध्ये ‘मूंग’, इंग्रजीत ‘ग्रीन ग्राम’, तर शास्त्रीय भाषेमध्ये ‘व्हिना रेडिआटा’ (Vigna Radiata) या नावाने ओळखले जाणारे मूग ‘पॅपिलिओनसी’ कुळातील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाच्या सुरुवातीला पावसाळी पीक म्हणून मुगाची लागवड केली जाते. मुगाचे रोप साधारणतः दीड ते दोन हात उंच एवढे वाढते. मुगाचे रोप, पाने आणि शेंगा हिरव्या रंगाच्या असतात. रोपाच्या फांद्यांना आकर्षक पिवळी फुले येऊन त्यावर शेंगा लगडतात.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : मूग पित्तशामक, शीत, रूक्ष, लघु व मधुर गुणधर्माचे असून, त्रिदोषशामक आहेत. त्यामुळेच आजारी व्यक्तीसाठी मूग उत्तम समजले जातात. पथ्यकर आहार म्हणून मुगाचा उल्लेख केला जातो. पित्तप्रकृतीच्या लोकांनी, तसेच पित्तजव्याधी झालेल्या व्यक्तींनी मुगाचे अवश्य सेवन करावे.

आधुनिक शास्त्रानुसार : मुगामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, किंचित ‘बी’ जीवनसत्त्व, प्रथिने, मेद, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, आर्द्रता ही सर्व घटकद्रव्ये असतात.

हेही वाचा – स्लाईड गिटार वाजवणारी पहिली भारतीय स्त्री…डॉ. कमला शंकर

उपयोग :

१) मूग पौष्टिक आहेत, परंतु ते भिजवून मोड आणून त्याचा आहारात वापर केल्यास त्याची पौष्टिकता तिप्पट वाढते. याकरिता सहसा आहारात मोड आलेल्या मुगाची उसळ, मोड आलेले मूग वापरून तयार केलेला भात वापरावा.

२) मोड आलेले मूग किंचित परतून त्याला मीठ, जिरे, मोहरी यांची फोडणी द्यावी व सकाळी न्याहारीला एक वाटीभर मूग खाल्ल्यास वजन आटोक्यात राहून आरोग्य प्राप्त होते.

३) ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, अशा व्यक्तींनी फक्त जवसाची चटणी टाकून कच्चे मोड आलेले मूग खावेत. यामुळे वजन आटोक्यात राहून बुद्धी, स्मृती व त्वचेची कांती वाढते.

४) मूग वाफवून त्यामध्ये गाजर, काकडी, टोमॅटो घालून त्यात थोडी शेव, लिंबू, तिखट, मीठ टाकून भेळ बनवून खावी. ही भेळ आरोग्यदायी असते.

५) मोड आलेले मूग वाटून किंवा मुगाच्या डाळीच्या पिठापासून धिरडे बनवून ते नारळाच्या चटणीसोबत किंवा जवसाच्या चटणीसोबत खावे. यामध्ये भरपूर प्रथिने असल्याने व भूक शमविण्याची शक्ती असल्याने स्थूल व्यक्तींनी याचा आहारामध्ये वापर करावा.

६) रुग्णांची पचनशक्ती कमी झालेली असते. अशा वेळी आजारी व्यक्तीस मुगाचे वरण, भात किंवा मुगाची खिचडी अशा स्वरुपात आहार देणे गुणकारी असते.

७) ज्यांना पित्ताचा त्रास होतो, अशा व्यक्तींनी आहारामध्ये तूरडाळीऐवजी मूगडाळीचा वापर करणे श्रेष्ठ ठरते.

८) मूगडाळीचे पापड बनवून ते जेवणाबरोबर खावेत. याने तोंडास रुची उत्पन्न होऊन भूक चांगली लागते व घेतलेले अन्न व्यवस्थित पचते.

९) आजारी व्यक्तीस तापामध्ये मुगाचे निवळ पाणी पाजावे. मुगाचे पाणी सकस असल्यामुळे गुणकारी ठरते.

१०) हिवाळ्यामध्ये जठराग्नी प्रदीप्त होऊन वारंवार भूक लागल्याची भावना होते. अशा वेळी मुगाच्या डाळीचे पीठ तुपात भाजून त्यात साखर, वेलची, बदाम, पिस्ते, काजू घालून लाडू बनवावेत. हे लाडू शक्तिवर्धक, वातपित्तशामक, उत्साह निर्माण करणारे व वीर्यवर्धक असतात.

११) मुगाचे पीठ सायीच्या दुधात कालवून त्यात थोडी हळद टाकावी. याने सर्व शरीराला मालीश करावे. त्याचबरोबर चेहऱ्याला याचा लेप लावला असता चेहरा उजळ व कांतियुक्त होतो. तसेच त्वचेवरील लव नाहीशी होऊन शरीराची त्वचा मऊ व कांतियुक्त होते.

१२) मूग उकळून त्याच्या पाण्याने केस धुतल्यास केसांमधील कोंडा नाहीसा होऊन रूक्ष झालेले केस मऊ, मुलायम होतात.

हेही वाचा – ‘महिला अत्याचारा’चा विषय पुन्हा बाजूला पडणार आहे…!

सावधानता :

मूग हे रूक्ष, हलके गुणधर्माचे व किंचित वायुकारक असल्याने वातप्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी, तसेच वातविकार असणाऱ्यांनी ते प्रमाणातच खावे. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, अशांनी मूग मोड आणून वाफवून खावेत. सहसा कच्चे मूग खाऊ नये. त्याचा पचनशक्तीवर ताण येऊन पोटात गुबारा धरणे, अपचन होणे अशी लक्षणे निर्माण होऊ शकतात.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mung is an easy to digest pulse in ayurveda mung bean is said to be best as a dietary food ssb