प्राची पाठक

पूर्वी दूरदर्शनवर रात्री शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम लागत असत. त्यात विविध कलाकार येत. त्यात कमला शंकर आणि झरीन दारुवाला यांची ओळख झाली. कमला या हवाईयन गिटारसाठी आणि झरीन या सरोदसाठी प्रचंड आवडू लागल्या. दोघींची वाद्यं वेगळी, परंतु काय ताकदीचं गमक आणि मिंड त्यातून निघते, ते त्यांच्या वादन शैलीतून समजलं.

Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!

डॉ कमला शंकर यांचा जन्म तंजावरचा. त्या मूळच्या तमिळ असल्या तरी गेल्या चार पिढ्या बनारसला गेल्यामुळे अतिशय गोड हिंदी बोलतात. लहान वयातच त्यांना गायनाचं शिक्षण त्यांची आई विजया शंकर आणि गुरु अमरनाथ मिश्र यांच्याकडून मिळालं. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी हवाईयन गिटार हातात घेतली. मुळातच गायन आधी शिकलेल्या असल्यानं त्यांनी हवाईयन गिटार म्हणजेच स्लाईड गिटार जसं गातो, तशा अंगानं वाजवायला सुरुवात केली. शिवनाथ भट्टाचार्य आणि पंडित छन्नूलाल मिश्र यांच्याकडे पुढचं संगीताचं शिक्षण घेतलं.

साध्या गिटारला एकूण सहा तारा असतात आणि ती प्लेक्ट्रमनं छेडून वाजवतात. हवाईयन गिटार मांडीवर आडवी ठेवून एक धातूचा लहानसा रॉड तारेवर एका हातानं फिरवून आणि दुसऱ्या हातानं योग्य ती तार छेडून वाजवली जाते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतानुसार त्यांनी या स्लाईड गिटारमध्ये काही बदल केले. चिकारीच्या तारा टाकल्या. त्यामुळे, व्हायोलिन, सारंगी, बासरी यांत मिळते तशी सुरांची गायनशैलीस अनुरूप सलगता त्यांना मिळू लागली.

या स्लाईड गिटारमध्ये मुख्य चार तारा आहेत. चिकारीच्या पाच तारा आणि तरफेच्या इतर तारा पकडून एकूण अठरा तारा याला आहेत. या वाद्याचं डॉ. कमला यांनी ‘शंकर स्लाईड गिटार’ असं नामकरण केलं आहे. हे त्यांच्या नावाशी संबंधित नाही, तर भगवान शंकराला आपली संगीत कला अर्पण, अशा भावातून आहे. या वाद्यावर पीएच.डी. करणाऱ्या, त्यावर शास्त्रीय संगीत वाजवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय स्त्री कलाकार आहेत. त्यांच्या शंकर गिटारला ट्यून करताना- म्हणजेच वाद्य सुरात लावताना ऐकणं, हेसुद्धा फार गोड असतं.

डॉ. कमला यांची विशेषता म्हणजे त्या स्लाईड गिटारवर ठुमरी, चैती, दादरा, भजन, बनारसी कजरी यांबरोबरच बंगाली रवींद्र संगीतदेखील वाजवतात. ‘एकला चलो रे’ हे सुप्रसिद्ध बंगाली गाणं त्यांच्या शंकर गिटारवर फार सुंदर वाजतं. एकेका रागाची आलापी, जोड, झाला, अशा क्रमानं आपल्याला होणारी शंकर गिटारवरची संगीताची ओळख फारच अनोखी असते.

आपल्याबरोबरच्या कलाकारांना प्रोत्साहन देणं, शिष्यांचं योग्य कौतुक करत त्यांची साथ संगीतात घेणं, हे त्या फार सहजतेनं करतात. लता मंगेशकरांनी गायलेलं ‘मन रे तू काहे ना धीर धरे,’ हे गाणं तुम्ही ऐकलं असेल, तर तेच गाणं शंकर स्लाईड गिटारवरदेखील ऐकून पाहा. त्या संगीत रचनेत मुळातच एक आध्यात्मिक आवाहन आहे. हेच गाणं जेव्हा शंकर स्लाईड गिटारवर सादर होतं, तेव्हा कलेतून अध्यात्माची झलक दिसल्याशिवाय राहात नाही. आपोआपच डोळे मिटतात आणि मन तल्लीन होऊन ते सादरीकरण ऐकू लागतं. ‘उड जायेगा हंस अकेला’ ही लोकप्रिय रचना त्या शंकर गिटारवर फार प्रभावीपणे सादर करतात. गायन शैलीत वाद्यसंगीत सादर करायची हीच नजाकत असते. तंत्रकारी पद्धतीनं वाद्य वाजवल्यास सूर तुटू शकतो, परंतु गायकी शैलीत वाद्यसंगीत सादर करताना जसे सूर गळ्यातून निघतात, तशी अनुभूती मिळते.

बनारस हिंदू विश्वविद्यालयात डॉ. कमला शंकर संगीत शिकवतात. त्याबरोबरच त्यांनी ‘शंकर आर्टस् फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. त्यातून नवीन कलाकारांना, तरुण कलाकारांना त्या सातत्यानं प्रोत्साहन देत असतात. “शास्त्रीय संगीतात कोणताही ‘शॉर्टकट’ नाही, निष्ठेनं सराव करत राहणं, कलेची साधना करणं, हाच संगीतसाधनेचा खरा मार्ग आहे,” हे त्या सहजपणे कलाकारांना शिकवून जातात.

prachi333@hotmail.com

lokwomen.online@gmail.com