IIT JEE [इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – संयुक्त प्रवेश परीक्षा] ही देशामधील अतिशय कठीण परीक्षांपैकी एक असून, त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी उत्तम नियोजन, जिद्द आणि शिस्तबद्धता या सर्व गोष्टी आवश्यक असतात. अंडर ग्रॅज्युएट इंजिनीअरिंग प्रोग्राम्सकरीता असणाऱ्या प्रवेश परीक्षा, जेईई मेनच्या २०२४ चा दुसऱ्या सत्राचा निकाल हा एनटीएने [NTA] एप्रिलमध्ये जाहीर केला होता. त्यात मुलींमध्ये सान्वी जैन हिने अखिल भारतीय ३४ वा क्रमांक पटकावला आहे.

अन अकॅडमीच्या जी नेक्सस मुलाखतीमध्ये सान्वीने परीक्षेसाठी तयारी करताना तिला कोणकोणत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले होते, याबद्दल माहिती दिली असल्याचे डीएनएच्या एका लेखावरून समजते. “मला अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. कधीकधी मला अजिबात चांगले गुण मिळत नव्हते. तेव्हा मी नक्की कोणत्या ठिकाणी चूक करत आहे, माझ्या कोणत्या संकल्पना चुकत आहेत हे पाहत असे. काही वेळेस सेंद्रिय रसायनशास्त्राचा अभ्यास करताना मला त्रास व्हायचा, कारण त्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला लक्षात ठेवाव्या लागायच्या. माझ्यासमोर बरीच आव्हाने होती, पण शेवटी मी यशस्वी झाले आहे”, असे सान्वीने म्हटले आहे.

हेही वाचा : “प्रवाशांना केवळ ड्रिंक्स सर्व्ह करण्याचे काम…” एअर होस्टेसने नोकरी सोडताना सांगितला तिचा अनुभव…

मूळची बंगळुरूची असणारी सान्वी ही तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा विचार करत आहे. सान्वीचे वडील हे एक इंजिनियर आहेत. “खरंतर मी नववीत असल्यापासूनच तयारी करत होते, पण तेव्हा मला केवळ काही स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हायचे होते. नंतर अकरावीमध्ये असताना मी JEE मेन परीक्षेसाठी विचारपूर्वक तयारी सुरू केली. अर्थात, माझा प्रवास हा मुळीच सोपा नव्हता. पण, माझ्या कुटुंबीयांच्या आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे मी माझे प्रयत्न चालू ठेवले होते”, असे तिने द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

अनेक विद्यार्थ्यांनी JEE मेन परीक्षा दर वर्षी अधिकाधिक अवघड होत असल्याचे म्हटले आहे. असे असले तरीही, “दरवर्षी ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, परीक्षा अवघड होत नाहीत”, असे सान्वी म्हणते.

सान्वीला पुढे आयआयटी मुंबई किंवा आयआयएससी बंगळुरूमध्ये जागा मिळवायची आहे. मात्र, अद्याप तिने तिचे क्षेत्र किंवा इंजिनियरिंगची शाखा निश्चित केलेली नाही. एकूण १० लाख ६७ हजारांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यातील केवळ दोन लाख ५० हजार २८४ उमेदवार हे JEE [ॲडव्हाॅन्स] परीक्षा देण्यासाठी पात्र होऊ शकले आहेत.