आयरिश क्रिकेटला दिलं गेलेलं योगदान हे फक्त ओ’ब्रायन बंधूपुरतंच मर्यादित राहात नाही. त्यांचे वडील ब्रेंडन ओ’ब्रायन आयरिश क्रिकेटला लाभलेलं सुवर्णस्वप्न. शैलीदार फलंदाज आणि यष्टीरक्षक. ‘जिंजर’ या टोपणनावाने ते ओळखले जायचे. गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यात ते वाकबगार. शालेय वयातच रेल्वे युनियन क्रिकेट क्लबकडून स्थानिक स्पर्धामध्ये खेळायला त्यांनी प्रारंभ केला. खेळ हा ब्रेंडनच्या नसानसांत भिनलेला. हॉकी आणि फुटबॉल हे दोन खेळसुद्धा ते तितक्याच आत्मीयतेनं खेळायचे. शेलबोर्न रोव्हर्सकडून ते व्यावसायिक फुटबॉल खेळले. १९६४ मध्ये फुटबॉलला अलविदा करून त्यांनी हॉकीचा ध्यास घेतला आणि आयरिश चषक स्पध्रेत रेल्वेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर मात्र क्रिकेट त्यांनी गांभीर्यानं घेतलं. १९६६ ते १९८१पर्यंत ११ प्रथम श्रेणी सामन्यांत ते खेळले. परंतु या स्तरावर ते स्वत:ला सिद्ध करू शकले नाहीत. पण ७०५ स्थानिक सामन्यांमध्ये २१,७६५ धावांची पुंजी त्यांनी जमवली.
१०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या रेल्वे संघाच्या यशात ब्रेंडनचा सिंहाचा वाटा. तोच पुढे त्याच्या सहा मुलांनी चालवला. पॉल, गेरार्ड आणि कोनोर हे तीन मोठे भाऊसुद्धा स्थानिक क्रिकेट खेळले. गेरार्डने तीन हंगामांमध्ये नेतृत्वसुद्धा केले. त्यांची बहीण सायरा हीसुद्धा १९ आणि २३ वर्षांखालील क्रिकेट खेळली. परंतु तिचा हॉकीकडे कल वाढत गेला आणि आर्यलड संघाचे दीडशे सामन्यांत तिनं प्रतिनिधित्व केलं. सध्या ती रेल्वे क्लबचे उपाध्यक्षपद सांभाळते आहे.
आयसीसी विश्वचषकात अनेक बंधूंच्या जोडय़ांनी आपले कर्तृत्व दाखवले. यात निल आणि केव्हिन ओ’ब्रायन या बंधूंनीही रुबाबात आपलं स्थान निर्माण केलं आहे. आर्यलडकडून सर्वात जास्त एकदिवसीय धावा (२१७८) आणि सर्वाधिक बळी (६८) सध्या केव्हिनच्या नावावर आहेत. फलंदाजांच्या यादीत भाऊ निल (१६४९) चौथ्या स्थानावर आहे. हे दोघे सलग तिसऱ्या विश्वचषकात खेळत आहेत. २००७मध्ये आर्यलडनं पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला, तर झिम्बाब्वेविरुद्धची लढत टाय राहिली. संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचवण्यात ओ’ब्रायन बंधूंच्या खेळीचे योगदान मोठे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज निलने ७२ धावा केल्या होत्या, तर २०११मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने ६३ धावा काढल्या. विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक केव्हिनने फक्त ५० चेंडूंत (६३ चेंडूंत ११३ धावा) याच सामन्यात झळकावले. यंदाच्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात विंडीजला नामोहरम करण्यात निलचे नाबाद ७९ धावांचे योगदान. त्यामुळे तमाम क्रिकेट राष्ट्रांनो सावधान, क्रिकेटचा वडिलोपार्जित वारसा लाभलेल्या ओ’ब्रायन घराण्याच्या भावांचा धक्का तुम्हाला बसू शकतो!
प्रशांत केणी
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2015 रोजी प्रकाशित
एक्स्ट्रा इंनिग :भाऊचा धक्का!
आयरिश क्रिकेट संघाचा आता सर्वानीच धसका घेतला आहे, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ‘भाऊचा धक्का.’ निल आणि केव्हिन हे ओ’ब्रायन बंधू.

First published on: 18-02-2015 at 03:00 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All team feel threat from ireland cricket team