लिहिणे हे पत्रकाराचे काम. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. या स्तंभाच्या रक्षणासाठी पत्रकारांना अनेकदा वाईटपणा घ्यावा लागतो. त्यामागचा उद्देश सचोटीचा असतो. मात्र दुसऱ्याच पत्रकाराच्या आगळीक लेखनासाठी शिवीगाळ सहन करावी लागण्याची घटना ऑस्ट्रेलियातल्या पर्थमध्ये घडली आहे. शिवीगाळ करणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून, भारताचा भावी कर्णधार विराट कोहलीच होती.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघ सराव करत होता. हा सराव संपल्यानंतर कोहली परतत होता. यादरम्यान एक पत्रकार त्याला सामोरा गेला. कोणाला काही कळण्याच्या आधी विराटने पत्रकाराला उद्देशून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी विराटबरोबर भारतीय संघातील काही खेळाडू होते. मात्र अचानक सुरू झालेला हा प्रकार पाहून तेही अवाक् झाले. त्या पत्रकारालाही या संतापाचे कारण उमगेना. शिव्यांची लाखोली वाहिल्यानंतर विराट पॅव्हेलियनमध्ये परतला. शांत झाल्यानंतर पत्रकारावर भडकण्याचे कारण विराटने सहकाऱ्यांना सांगितले.
विराट आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमप्रकरणासंदर्भात काही मजकूर देशातल्या अग्रगण्य दैनिकात प्रसिद्ध झाला होता. हे लिखाण विराटला आवडले नाही. तो मजकूर लिहिणारा पत्रकार हाच अशी विराटची समजूत झाली आणि त्याने त्या पत्रकाराला फैलावर घेतले. मात्र प्रत्यक्षात ते लेखन दुसऱ्याच पत्रकाराने केल्याचे समोर आले.
आपली गैरसमजूत झाल्याचे लक्षात आल्यानंतर विराटने त्या पत्रकाराशी संपर्क साधला आणि रीतसर माफी मागितली. दरम्यान, या प्रकरणानंतर भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी कोहलीला समजावले. भारतीय संघाचा भावी संघनायक म्हटल्या जाणाऱ्या खेळाडूने डोक्यात राग घालून असे वर्तन करणे योग्य नाही, असे शास्त्री यांनी कोहलीला समजावल्याचे समजते.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत दिल्लीचा सहकारी आणि मित्र गौतम गंभीरशी झालेले भांडण असो, आयपीएल स्पर्धेदरम्यानच मुंबईत चाहत्याला केलेली शिवीगाळ किंवा ऑस्ट्रेलियात चाहत्याच्या दिशेने केलेला अंगुलीनिर्देश असो, विराटच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नसल्याच्या घटनांमध्ये या प्रसंगाने भरच पडली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2015 रोजी प्रकाशित
वडय़ाचे तेल वांग्यावर!
लिहिणे हे पत्रकाराचे काम. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. या स्तंभाच्या रक्षणासाठी पत्रकारांना अनेकदा वाईटपणा घ्यावा लागतो. त्यामागचा उद्देश सचोटीचा असतो.

First published on: 04-03-2015 at 04:12 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli abuses ht journalist covering world cup