अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा चिदम्बरम यांना विश्वास
अर्थव्यवस्थेवरील मळभ आता सरत असून आगामी पथप्रवास गुंतवणूकपूरक वातावरणाने भारलेलाच असेल, अशी ग्वाही देशाच्या अर्थमंत्र्यांनी संवत मावळतीला दिली. उद्योगांनी रोकड जवळ न बाळगता बिनधास्त गुंतवणूक करावी, प्रतीक्षा करू नये, असा सल्लाही पी. चिदम्बरम यांनी दिला.
राजधानीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुंतवणुकीबाबत चिंता व्यक्त करताना सरकार त्या दिशेने सहकार्याचे पाऊल कायम टाकतच राहील असे सुचविले. नव्या गुंतवणुकीविषयक प्रस्तावांना सरकार केव्हाही पाठिंबाच देईल, त्यासाठी उद्योगांनी आपली रोकड रोखून धरण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले.
सप्टेंबरमध्ये मुख्य सेवा क्षेत्राची वाढ, यंदाचा चांगला मान्सून तसेच भरघोस निर्यात, हे आशादर्शक सुचिन्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक शिस्तीसाठी रिझव्र्ह बँक व केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजना या वाढत्या महागाई रोखण्यास यशस्वी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सरकारसाठी डोकेदुखी ठरलेली चालू खात्यातील तूटदेखील चालू आर्थिक वर्षांत ६० अब्ज डॉलपर्यंत आटोक्यात येईल, असा विश्वासही त्यांनी वाढती निर्यात आणि सोन्याची घटती आयात याच्या जोरावर देशवासीयांना दिला. बहुप्रतीक्षित विमा व्यवसायात ४९ टक्क्यांपर्यंतच्या विदेशी थेट गुंतवणुकीचे विधेयक संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल, असे ते म्हणाले. प्रत्यक्ष कर संहितेचा अंमलबजावणी आराखडा लवकर तयार होऊन तो केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट सरकार गाठेलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण ४.८ टक्के असेल. प्राप्तीकर कायद्यात पूर्वलक्ष्यी प्रभावाचा कर अंतर्भूत करण्याचा मुद्दा हा व्होडाफोन करवाद सुटल्यानंतरच विचारात घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चालू खात्यातील तूट गेल्या आर्थिक वर्षांत ८८ अब्ज डॉलर होती. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ४.८ टक्के अशी ती सर्वोच्च होती. चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारने ७० अब्ज डॉलरचा अंदाज बांधला आहे. गेल्या महिन्यात निर्यात वाढल्याने आणि तुलनेत आयात कमी झाल्याने यंदा कमी तुटीचा आशावाद सरकारला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या उर्वरित कालावधीत सोन्याची आयात प्रति मासिक २० टन अशी कमीच राहील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Nov 2013 रोजी प्रकाशित
उद्योगांनो, पैसा उशाला ठेवू नका, गुंतवणूक करा : अर्थमंत्री
अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचा चिदम्बरम यांना विश्वास अर्थव्यवस्थेवरील मळभ आता सरत असून आगामी पथप्रवास गुंतवणूकपूरक वातावरणाने भारलेलाच असेल, अशी ग्वाही देशाच्या अर्थमंत्र्यांनी संवत मावळतीला दिली. उद्योगांनी रोकड जवळ न बाळगता बिनधास्त गुंतवणूक करावी, प्रतीक्षा करू नये, असा सल्लाही पी. चिदम्बरम यांनी दिला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-11-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P chidambaram says let invest the money dont keep it