मुंबई : वाढती महागाई आणि मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढीचे धोरण अंगीकारले जात असल्याने जागतिक पातळीवर मंदीचे ढग गडद होत असल्याच्या भीतीने मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्याची घसरण झाली. जागतिक पातळीवरील संमिश्र कल आणि परदेशी निधीच्या वाढत्या निर्गमनामुळे सेन्सेक्सला पाच शतकी झळ बसली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्समध्ये ४९७.७३ अंशांची घसरण होत तो ५५,२६८.४९ पातळीवर बंद आला. दिवसभरात सेन्सेक्सने ५६२.७९ अंश गमावत ५५,२०३.४३ अंशांच्या नीचांकी पातळी दाखविली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक-निफ्टीमध्ये १४७.१५ अंशांची घसरण झाली आणि तो १६,५०० खाली १६,४८३.८५ पातळीवर स्थिरावला.

जागतिक पातळीवरील बलाढय़ कंपन्यांची तिमाहीतील आर्थिक कामगिरी समाधानकारक राहिलेली नसून भविष्यातील कामगिरी देखील खालावण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. यातून जागतिक आर्थिक मंदीच्या चिंतेची पकड अधिक घट्ट बनत चालली आहे. याचबरोबर अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हच्या सुरू झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात आणखी थेट पाऊण टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारातील पडझड कमी झाली असली तरी नजीकच्या काळात पाश्चिमात्य देशातील वाढत्या मंदीच्या भीतीचे पडसाद येथेही उमटण्याची शक्यता आहे. सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, हिंदूस्तान युनिलिव्हर, डॉ. रेड्डीज लॅब, विप्रो, कोटक बँक आणि लार्सन अँड टुब्रोच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर दुसरीकडे बजाज फिनसव्‍‌र्ह, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे समभाग तेजीत होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Share market today sensex drops 498 points nifty ends at 16468 zws