Chandra Grahan 2025: साल २०२५ मधील शेवटचं चंद्रग्रहण रविवारी रात्री लोकांसाठी एक खास खगोलीय दृश्य ठरलं. संध्याकाळ होताच लोकांचे डोळे आकाशावर खिळले. रात्री ९:५८ वाजता चंद्रावर सावली पडताच लोकांचा उत्साह वाढला. साधारण ३ तास २८ मिनिटं २ सेकंद चाललेलं हे अप्रतिम दृश्य सगळ्यांना मोहून टाकणारं होतं.
रात्री १:२६ वाजता ग्रहण संपलं, पण त्याआधी चंद्राच्या लालसर प्रकाशामुळे आकाश खूप गूढ दिसत होतं. देशभरातून लोकांनी हे पाहिलं आणि सोशल मीडियावरही #ChandraGrahan आणि #BloodMoon ट्रेंड होत होतं. ज्योतिषशास्त्राच्या मते, ‘ब्लड मून’ दिसणं हा एक दुर्मिळ योग आहे आणि असा प्रसंग नेहमीच अनुभवायला मिळत नाही.
भारतामध्ये २०२२ नंतरचं सगळ्यात जास्त वेळ दिसलेलं चंद्रग्रहण (Chandra Grahan End Time)
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हे चंद्रग्रहण भारतात २०२२ नंतर सगळ्यात जास्त वेळ दिसलेलं पूर्ण चंद्रग्रहण होतं. या वेळी लोकांनी जवळपास दीड तास चंद्राच्या रंग आणि रूपातील बदल पाहिले. ‘अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’ (ASI) च्या ‘पब्लिक आउटरीच अँड एज्युकेशन कमिटी’ (POEC) च्या अध्यक्षा आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स, पुणे येथील असोसिएट प्राध्यापक दिव्या ओबेरॉय यांनी सांगितलं की असं खगोलीय दृश्य भारतात पुन्हा पाहायला लोकांना आता बराच काळ वाट पाहावी लागेल. त्यांच्यानुसार पुढचं पूर्ण चंद्रग्रहण ३१ डिसेंबर २०२८ रोजी दिसेल.
चंद्र लाल-निळा का दिसतो?
शास्त्रज्ञ सांगतात की चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते. तेव्हा सूर्यप्रकाश थेट चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही. पृथ्वीचं वातावरण प्रकाशाला वाकवून फक्त लाल आणि निळा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचू देतं. म्हणूनच चंद्र कधी लाल “ब्लड मून” तर कधी निळा “ब्लू मून” दिसतो.
धार्मिक महत्त्व आणि परंपरा
भारतीय परंपरेत चंद्रग्रहणाला खास महत्त्व दिलं जातं. ग्रहण लागण्यापूर्वी सूतक काळ पाळला जातो, यात धार्मिक कार्यक्रम, जेवण आणि पूजा थांबवली जाते. ग्रहण संपल्यावर अनेक ठिकाणी स्नान, दान आणि मंत्रजप यांसारखे विधी केले जातात. राजस्थानसह देशातील अनेक राज्यांमध्ये मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले गेले आणि ग्रहण संपताच लोकांनी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली.
पुढील खगोलीय घटना
खगोलशास्त्रज्ञांच्या मते, पुढचं पूर्ण चंद्रग्रहण मार्च २०२६ मध्ये होईल, तर आंशिक चंद्रग्रहण ऑगस्ट २०२६ मध्ये दिसेल. पण भारतात पूर्ण चंद्रग्रहणाचं दृश्य आता २०२८ च्या शेवटीच पाहायला मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)