Ghatasthapana 2025 Start and End Date Time Rituals: हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार असून संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते; तर दुसरी शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. परंतु, चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.
यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ रूपांची पूजा-आराधना व सेवा केली जाते. नऊ दिवस उपवासही केला जातो. आज आपण घटस्थापना नक्की कशी करावी आणि घटनस्थापनेचा शुभ मुहूर्त काय हे जाणून घेऊ…
शारदीय नवरात्र २०२५ तारीख आणि शुभ मुहूर्त
हिंदू दिनदर्शिकेनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २२ सप्टेंबर (सोमवार) रोजी मध्यरात्री ०१ वाजून २३ मिनिटांपासून सुरू होईल आणि २३ सप्टेंबर (मंगळवारी) रोजी २ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल.
घटस्थापना शुभ मुहूर्त
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त २२ सप्टेंबर रोजी सकाळी ०६ वाजून ०९ मिनिटांपासून ते सकाळी ०८ वाजून ०६ मिनिटांपर्यंत आहे. या वेळेत तुम्ही घटस्थापना करू शकता. तसेच अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल.
घटस्थापना केव्हा केली जाते?
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात; तर काही जणांकडे कलश मांडतात, त्याला घटस्थापना म्हणतात. एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत. या नऊ रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते. म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते.
पूजा कोणत्या दिवशी होणार?
- २२ सप्टेंबर, सोमवार – माता शैलपुत्रीची पूजा
- २३ सप्टेंबर, मंगळवार – ब्रह्मचारिणी मातेची पूजा.
- २४ सप्टेंबर, बुधवार – चंद्रघंटा मातेची पूजा
- २५ सप्टेंबर, गुरुवार – कुष्मांडा मातेचे पूजन
- २६ सप्टेंबर, शुक्रवार – आई स्कंदमातेची पूजा
- २७ सप्टेंबर, शनिवार – कात्यायनी मातेची पूजा
- २८ सप्टेंबर, रविवार – देवी कालरात्रीची पूजा
- २९ सप्टेंबर, सोमवार – देवी महागौरीची पूजा
- ३० सप्टेंबर, मंगळवार – देवी सिद्धिदात्रीची पूजा
- ०१ ऑक्टोबर, बुधवार – विजयादशमी (दसरा)
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)