छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले. मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील अनेक रस्ते, पूल आणि शेतं पाण्याखाली गेली आहेत.निलंगा तालुक्यातील उस्तुरी, टाकळी आणि बडूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सांगवी, जेवरी, अंबुलगा बुद्रुक तसेच निलंगा ग्रामीण भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. लातूर ग्रामीणमधील मुरुड आणि परिसरातील अनेक भागांतही सकाळपासून पावसाचा जोर कायम होता.
रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, प्रशासनाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही भागांत वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती मिळाली आहे. पाच दिवसांच्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेग दिला होता. अनेकांनी सोयाबीन काढणीस सुरुवात केली होती. मात्र, या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर पुन्हा एकदा पावसाने पाणी फेरल्याची स्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मांजरा धरणातून ३५ हजारांवर क्युसेक विसर्ग
बीड : गेल्या काही दिवसांत केज तालुक्यात असलेल्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. मात्र, मांजरा धरणात होत असलेली पाण्याची आवक पाहता आता पुन्हा एकदा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मांजरा धरणाचे एकून सहा वक्री दरवाजे १.७५० मीटर उचलत नदीपात्रात ३५ हजार ८९० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेले काही दिवस मांजरा धरणाचा विसर्ग बंद होता. मात्र, शनिवारपासून नदीपात्रात पुन्हा विसर्ग केला जात आहे. रविवारी क्र. १ ते ६ दरवाजे उघडत नदीपात्रात विसर्ग केला असल्याने मांजरा नदी काठावरील नागरिकांना खबरदारीचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.
धाराशिवमध्येही जाेरदार पाऊस
धाराशिव जिल्ह्यातील कळंब, वाशी, भूम तालुक्यात शनिवारी रात्री ते दिवस उजडेपर्यंत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या इतर काही तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. येरमाळा, तेरखेडा, पारगाव, सोंडी, सरमकुंडी आदींसह परिसरातील अनेक गावांमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पाऊस झाला. विजांचा कडकडाट एवढा प्रचंड होता की, भूकंपासारख्या आवाजाने काही गावातील ग्रामस्थांनी घर सोडून बाहेरचा एक निवारा शोधून रात्र जागून काढली.