छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल ५० हजार संख्येने भटक्या श्वानांचा अधिवास असून, त्यांचे निर्बिजीकरण करणे हे महानगरपालिका यंत्रणेपुढे एक आव्हान होऊन बसले आहे. मनपाकडून सध्या महिन्याला ७०० भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप एकही नसबंदी शून्य झाला नाही. नसबंदीसाठी प्रतिश्वान एक हजार ३०० रुपये खर्च येत असल्याची माहिती आहे. अलीकडेच शहरातील संजयनगरमध्ये अरमान नावाच्या तीन वर्षांच्या मुलाचा श्वानांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बिजीकरण करण्याची मागणी पुढे येऊ लागली. सर्वोच्च न्यायालयाकडूनही सर्वच ठिकाणच्या भटक्या श्वानांच्या प्रश्नाची दखल घेण्यात आली आहे. भटक्या श्वानांना सरकारी आणि सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कंपन्यांसह इतर संस्थांमध्ये खाऊ घालण्याच्या मुद्द्यावर येत्या ७ नोव्हेंबर रोजी निर्देश देण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शहराच्या काही भागांमध्ये भटक्या श्वानांच्या झुंडीच्या झुंडी आढळून येत असून, त्यांच्यातील एकाने त्याचे क्षेत्र बदलले, तर दुसऱ्या भागातील श्वानाची झुंड हल्ला करून जखमी करत असल्याचे चित्रही पाहायला मिळते आहे. त्यातून रेबिज पसरून श्वान पिसाळण्याची दाट शक्यता असते. परिणामी त्यापासून माणसांनाही धोका निर्माण होऊ शकतो.
संकेतस्थळावर श्वानांची संख्या हवी ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या (एडब्ल्यूबीआय) संकेतस्थळावर महापालिकेने श्वानांची प्रभागनिहाय संख्या, नसबंदी कोणती संस्था करतेय, अशी काही माहिती नोंदवणे अपेक्षित असते. परंतु तशी माहिती दिसत नाही. नोंदणीकृत संस्थेकडूनच निर्बिजीकरण करून घेण्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाचेही निर्देश आहेत. अपघाती मृत्यूू पावलेल्या प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी एक जागा मनपाने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन (आपला) ही संस्था भटक्या श्वानांसाठी काम करते. मनपासाठीही करू; पण प्रतिसादही मिळायला हवा. – बेरील सांचीज,
महानगरपालिका कार्यक्षेत्रात साधारणपणे ५० हजार संख्येच्या आसपास भटके श्वान आहेत. नसबंदीवर प्रतिश्वान तेराशे रुपये खर्च होतो. महिन्याकाठी ७०० च्या आसपास श्वानांची नसबंदी केली जाते. – डाॅ. शाहेद शेख, प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी, मनपा
‘डब्ल्यूव्हीएस-होप’ या संस्थेमार्फत मनपाच्या कार्यक्षेत्रातील श्वानांवर उपचार व महिन्याला किमान ४०० श्वानांची नसबंदी केली जाते. नसबंदीसाठी प्रतिश्वान तेराशे रुपये घेतले जातात. – प्रवीण ओव्हळ, सचिव
श्वान निर्बिजीकरणासाठी भूल, औषधे, जखम भरून येण्यासाठी प्रतिजैविके, शस्त्रक्रियेच्या ठिकाणचे आतले-बाहेरचे टाके, निर्बिजीकरणाच्या संदर्भाने कानाला खूण करून गळ्यात बिल्ला अटकवणे आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनाचे शुल्क असा मिळून साधारणपणे प्रतिश्वान बाराशे ते तेराशे रुपये खर्च अपेक्षित असतो. – डाॅ. विजय लाड, ज्येष्ठ पशुतज्ज्ञ
