छत्रपती संभाजीनगर : दोन कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या सातवर्षीय मुलाचे कारमध्ये कोंबून अपहरण करण्यात आले. ही घटना शहराच्या गजबजलेल्या वस्तीचा भाग असलेल्या उच्च न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या सिडको एन ४ मध्ये घडली. या घटनेनंतर पोलिसांनी ३० अधिकारी आणि १५० अंमलदाराची पथके स्थापन करून आरोपींना जाफराबाद (जि. जालना) परिसरातून ताब्यात घेत मुलाची सुखरूप सुटका केली. ही माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शीलवंत नांदेडकर, प्रशांत स्वामी, नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, गीता बारगडे, संभाजी पवार आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हर्षल पंढरीनाथ शेवत्रे (वय २१), जीवन नारायण शेवत्रे (२६), प्रणव समाधान शेवत्रे (१९), कृष्णा संतोष पठाडे (वय २०, चौघेही रा. ब्रह्मपुरी जि. जालना) व शिवराज उर्फ बंटी गायकवाड (२० रा आळंद ता जाफराबाद) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींवर यापूर्वीचे कुठलेही गुन्हे दाखल नसून केवळ झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गाच्या आमिषाने आरोपीनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील कृष्णा पठाडे हा छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. सर्व आरोपींनी बिहारमधील एका व्यक्तीची मदत घेतल्याचे निष्पन्न होत असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.

पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिडको एन – ४ मधून चैतन्य सुनील तुपे या सात वर्षीय मुलाचे मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर बिल्डर असलेले चैतन्यचे वडील सुनील तुपे यांच्याकडे दोन कोटींची मागणी करण्यात आली होती. पोलीस आयुक्तांनी राज्यासह बाहेरील राज्यातील पोलिसांशी संपर्क ठेवून प्रकरणावर संपूर्ण पथक लक्ष ठेवून होते, असे सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhajinagar builder s son kidnapped for 2 crores ransom safely rescued by police accused detained from jafrabad css