छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता रस्ते अपघातातील मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने उपाययोजना आखून काही उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या संदर्भाने देशपातळीवर अपघातप्रवण १०० जिल्ह्यांची निवड केली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यातला छत्रपती संभाजीनगर एक आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, सेव्ह लाइफ फाऊंडेशनच्या तांत्रिक सहाय्याने झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रीक्ट्स (झेडएफडी) कार्यक्रमाची देशभरात अंमलबजावणी करीत आहे. अभियांत्रिकी, अंमलबजावणी, ट्रॉमा केअर आणि समुदाय सहभाग या चारही घटकांच्या एकत्रित प्रयत्नातून अपघात मृत्यूदर प्रभावीरीत्या कमी करण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमामध्ये निश्चित करण्यात आले आहे. यासाठी देशातील अपघातांची संख्या, मृत्यूदर व तीव्रता यांच्या आधारे जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. देशातील अपघात मृत्यूदराच्या क्रमांकात छत्रपती संभाजीनगर जिल्हा ३७ व्या स्थानी असल्याने या उपक्रमाची अंमलबजावणी अधिक वेगाने करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांना १८ नोव्हेंबर रोजी आधुनिक सुविधांनी युक्त इर्टिगा इंटरसेप्टर वाहन प्राप्त झाले आहे. हे वाहन विशेषतः बेशिस्त, वेगाने वाहन चालविणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर व त्वरित दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या वाहनासाठी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या निर्देशांनुसार आणि पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याला हे महत्त्वाचे साधन उपलब्ध झाले आहे, अशी माहिती येथे देण्यात आली.

इंटरसेप्टर वाहनाचे उदघाटन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपअधीक्षक गौतम पातारे, पोलीस निरीक्षक (वाहतूक) आनंद झोटे, प्रंशात महाजन, संतोष वायचल (मोटार परिवहन शाखा), केदारनाथ पालवे आदी उपस्थित होते.

संबंधित इंटरसेप्टर वाहन रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून अतिवेगाने वाहन चालविणारे, विनासिटबेल्ट वाहन चालविणारे, विना हेल्मेट दुचाकीस्वार, काळी फिल्म लावलेली वाहने, तसेच मद्यपान करून वाहन चालविणारे अशा सर्व वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात या वाहनाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होण्यास मदत होईल, अपघातांना आळा बसेल आणि मृत्यूदर कमी होईल अशी अपेक्षा आहे.

किती अपघात प्रवण क्षेत्रे

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण घटकात सध्या ३२ अपघात प्रवणक्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) ओळखली गेली आहेत, ज्याठिकाणी गेल्या काही वर्षांत एकाच ठिकाणी पाचपेक्षा जास्त मृत्यू नोंदवले गेले आहेत. या सर्व ठिकाणी इंटरसेप्टर वाहनाद्वारे नियमित गस्त, तपासणी आणि कारवाई करण्यात येणार असून या उपक्रमामुळे अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होणार आहे. “शून्य अपघात क्षेत्र” म्हणून घोषित व्हावा यासाठी प्रशासकीय विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक स्वयंसेवी संघटनांच्या सहभागातून जनजागृती मोहीमा, प्रशिक्षण कार्यशाळा आणि विविध सुरक्षाबाबतचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.