महापालिकेसह विविध विकासकामांचा आढावा

औरंगाबाद : मुंबईनंतर शिवसेनेसाठी मराठवाडा महत्त्वाचा, असे सेनेचे नेते नेहमी सांगतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ९ आणि १० जानेवारी रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार असल्याने मराठवाडय़ातील महत्त्वपूर्ण प्रश्नांची माहिती संकलित केली जात आहे. यात नदीजोड प्रकल्प, वॉटरग्रीड, विहिरीच्या योजना, पाणीपुरवठय़ाचे उद्भव, वन्यजीव यासह नव्या-जुन्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. यात शिवभोजन योजनेचाही समावेश आहे. नव्याने जाहीर केलेली महात्मा फुले कर्जमाफी योजना ‘मर्यादित’ राहते की काय, अशी शंका घेतली जात असल्याने त्याचा आढावा आवर्जून घेतला जाणार आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींची मागणी विभागीय पातळीवर एकत्रित केली जात आहे. या बैठकीत महापालिकेच्या अनागोंदी कारभाराबाबतही आढावा घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहर पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती, कचऱ्यामुळे दोन वेळा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांची मागितलेली जाहीर माफी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ते अधिकाऱ्यांना कोणत्या आणि काय सूचना देतात, याकडे लक्ष लागले आहे. ‘मसिआ’ या उद्योजकांच्या संघटनेकडून होणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याने उद्योजकांच्या अडीअडचणींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचा समारोप केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे उद्योग आणि मराठवाडय़ाच्या विकासाचे इतर प्रश्नही चर्चेत येणार आहेत. दोन दिवस मुख्यमंत्री मराठवाडय़ात असल्यामुळे कृषी, पाणी या महत्त्वपूर्ण विषयांबरोबरच विविध प्रश्न चर्चेत येण्याची शक्यता आहे.

‘नदीजोड’चे आव्हान

मराठवाडय़ाच्या विकासासाठी नदीजोड प्रकल्प करणे अत्यावश्यक मानले जाते. विविध खोऱ्यातील पाणी मराठवाडय़ात वळविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रस्तावांची माहिती जलसंपदा विभागाला पूर्वीच देण्यात आली होती. त्यानुसार ऊध्र्व वैतरणा धरणाचे समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील सॅण्डेल धरणावर लोखंडी द्वार बसवून बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्याच्या मुकणे धरणात वळविणे आवश्यक आहे. तसा प्रस्तावही देण्यात आला होता. त्यावर निर्णयही घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी महाआघाडीचे सरकार करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर वैतरणा व उल्हास नदीच्या खोऱ्यातून १३५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. भालसा-काळू नदीच्या संगमावर पंपहाऊस बांधून भालसा-दारण किंवा भंडारदरा धरणमार्गे २५ टीएमसी पाणी मिळू शकते. त्याचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे. त्याचबरोबर गोदावरी खोऱ्यातून ५२ अब्ज घनफूट पाणी तेलंगणा राज्यात वाहून जाते. त्यासाठीच्या योजना प्रस्तावित कराव्यात, अशाही सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या होत्या. त्या पाण्याच्या योजनांबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला जाणार आहे. केवळ मराठवाडा हा शिवसेना महत्त्वाचा आहे, असे तोंडी न म्हणता त्यासाठी सकारात्मक निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.