औरंगाबादमध्ये करोना अद्यापि दुसऱ्याच टप्प्यावर

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बुधवारी सायंकाळी तीन रुग्णांची वाढ झाली होती, त्यात गुरुवारी आणखी एकाची भर पडली. हा रुग्ण रुग्णालयात दाखल व्यक्तीचाच नातेवाईक आहे. बुधवारी दाखल तीन रुग्णांपैकी त्यातील एकास नक्की कोठून लागण झाली हे समजू शकले नव्हते. एक दाखल रुग्णाच्या मुलीचा नातू असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाल्यानंतर औरंगाबाद शहरातील करोनाची बाधा दुसऱ्याच टप्प्यावर असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.

दरम्यान गुरुवारी ३८ अहवाल करोना चाचणीला नकारात्मक आल्याचे जिल्हा शल्यचिकि त्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. मराठवाडय़ात ३० रुग्ण करोनाबाधित असून त्यातील एक महिला रुग्ण बरी झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबादसारख्या शहरांमध्ये करोना रुग्णांच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्रिस्तरीय रुग्णालयाची रचना करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत. त्यानुसार सौम्य, मध्यम आणि तीव्र लागण अशी व्यवस्था केली जाणार आहे. केवळ ताप असणाऱ्याची वेगळी व्यवस्था तसेच ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसत आहेत, अशा व्यक्तीसाठी वेगळी व्यवस्था केली जावी, असे सांगण्यात आल्याने नव्याने जागांचा शोध सुरू झाला आहे. दरम्यान, गुरुवारी लातूर येथे दाखल असणाऱ्या आठ करोना रु ग्णांपैकी दोघांचे अहवाल चाचणीमध्ये नकारात्मक आले आहेत. तरीही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येणार आहेत.

औरंगाबाद शहरात १५ रुग्ण करोनाबाधित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जालना, हिंगोली येथे प्रत्येकी एक, उस्मानाबाद जिल्ह्यात तीन रुग्ण आहेत. तर बीड जिल्ह्यातील एक रुग्ण नगर जिल्ह्यात दाखल आहे. आतापर्यंत मराठवाडय़ातील रुग्णांच्या जवळच्या तसेच परिसरातील १७५३ नमुन्यांपैकी १४२१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त असून ३०४ नमुने अद्याप प्रलंबित आहेत.