करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व औद्योगिक वसाहती बंद करण्यात आल्याने राज्यातील विजेच्या मागणीत पाच ते सहा हजाराची घट असून आली आहे. परिणामी राज्यातील काही वीज निर्मिती केंद्रातून वीज घेणे महावितरणकडून बंद करण्यात आले आहे. राज्यातील  रविवारी दुपारी १४ हजार ३०० मेगावॅट विजेची मागणी होती. रात्री ही मागणी ११ हजार ६०० मेगावॅटपर्यंत खाली आली होती. त्यामुळे परळी, खापरखेडा, नाशिक आणि अमरावती जिल्ह्यतील वीज निर्मिती केंद्रातून वीज घेणे थांबविण्यात आले आहे. वीज मागणी घटल्याचे महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार कांबळे यांनी सांगितले.

मुंबई, पुणे व प्रमुख शहरातील औद्योगिक वसाहतीत करोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी औद्योगिक चाके थांबली. त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर होऊ लागला आहे. मराठवाडय़ात परळी औष्णिक वीज केंद्रामध्ये  ७५० मेगावॅटच्या केंद्रातून वीज निर्मिती सुरू होती. ती आता पूर्णत: थांबविण्यात आली आहे. ज्या क्षणी पुन्हा वीज सुरू करा, असे सांगितले जाईल तेव्हा पुन्हा वीज निर्मिती सुरू करता येईल. या वृत्तास महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार कांबळे यांनी दुजोरा दिला. दुष्काळामुळे पाणी नसल्याने दोन वर्षे वीज निर्मिती केंद्र बंद करण्यात आले होते. मध्यंतरी कोळसा नसल्यानेही परळी वीज केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नव्हते. आता करोना विषाणूमुळे औद्योगिक वसाहती बंद असल्याने वीज मागणी घटली. परिणामी भुसावळ, अमरावती येथून वीज घेणेही थांबविण्यात आले आहे. दरम्यान जेथील वीजनिर्मिती तुलनेने महाग आहे, तेथून ती घेणे आधी थांबवले जाते. विजेची मागणी घटल्याने भुसावळ येथील जुने ४२० तसेच खापरखेडा येथील चार संचातून होणारी ८४० मेगावॅट वीज वापर राहिलेला नाही.