औरंगाबाद : ऋतूबदलानंतरही पाऊस थांबण्याचे चिन्ह नसताना कृत्रिम पावसासाठी आभाळात मेघ बीजारोपण करणारी विमाने अजूनही घिरटय़ा घालत असल्याचा गमतीशीर प्रकार सध्या मराठवाडय़ासह काही भागांत पाहायला मिळत आहे.

सध्या पडणाऱ्या पावसाला ‘थांब रे बाबा’ अशी विनवणी करावी, इतके नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीपेक्षा मराठवाडय़ात ३३७.८५ टक्के पाऊस झाला. तरीही विमानांची उड्डाणे काही थांबली नाहीत.

वेधशाळेने अजूनही पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे. त्यात मेघ बीजारोपणासाठी विमानांचे उड्डाण होतच राहते. एखाद्या दिवसाची विमानदुरुस्तीची सुटी घेतली, की पुन्हा मेघ बीजारोपण करण्यासाठी विमानाचे उड्डाण होते. हिंगोली जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा ८० टक्केपेक्षा कमी पाऊस असल्याने या भागात मेघ बीजारोपण केल्याचे सांगण्यात येते. कोणत्या गावात पाऊस पडला याचा सविस्तर अहवालही तयार केला जातो. आता पावसाला थांबवा  अशी प्रतिक्रिया उमटत असताना मेघ बीजारोपणाचा खेळ सुरूच आहे. कृत्रिम पावसासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली होती. पण राज्यभरात पावसाने अक्षरश: थैमान घातलेले असताना आपण मात्र विमान उडवू, हा सरकारी खाक्या आजही कायम आहे.

कृत्रिम प्रयोग थांबेचना..

मराठवाडय़ात ४८ हजार हेक्टरवर झालेल्या पेरणीपैकी ३० हजार हेक्टरवरील पिके अतिपावसामुळे वाया गेली. पिकांना कोंब फुटले, बाजरी, मका हातचे गेले. ज्या जागी पीक कापून ठेवले, त्या ठिकाणी सोयाबीनला मोड आले. तरीही कृ त्रिम पावसाचा प्रयोग काही थांबला नाही. हा प्रयोग व्हावा म्हणून आग्रह धरला जायचा. आता थांबवा म्हणूनही आग्रह करावा लागेल, अशी स्थिती आहे.

मग उड्डाणे कशासाठी?  आपत्ती व्यवस्थापन कक्षातील सूत्रानुसार ८० टक्क्यांपेक्षा कमी ज्या भागात पाऊस आहे, अशा ठिकाणी मेघ बीजारोपण करण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. ऑक्टोबर महिन्यात १८ वेळा विमानांनी उड्डाणे केली. काही वेळा मेघ बीजारोपणायोग्य ढग सापडले, काही वेळा ते दिसले नाही, असा लेखी अहवाल आहे. मात्र, विमानांची ही उड्डाणे नक्की आता कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे.

कोटय़वधींचा खर्च : मराठवाडय़ात पावसाने ओढ दिल्यामुळे १० ऑगस्टपासून कृत्रिम पावसासाठीचा प्रयोग हाती घेण्यात आला. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ४९ वेळा विमानाने उड्डाण केले. पाऊस पडत होता तेव्हाही आणि राज्यभर पावसाचे थैमान सुरू आहे, तेव्हाही. ऑक्टोबरमध्ये जेव्हा मराठवाडय़ात पावसाची गती वाढली होती, तेव्हाही कृत्रिमचा प्रयोग सुरू होता. ४९ वेळा उड्डाण केलेल्या विमानाने ८०८ फ्लेअर्स मेघ बीजारोपण करण्यासाठी हवेत सोडण्यात आल्याची माहिती सरकारदरबारी आहे.