छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील नारवाडी-हदियाबाद येथे शुक्रवारी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (३०, रा. भालगाव, ता. गंगापूर) यांचा मृतदेह आढळून आला.

दोन दिवसांपासून गणेश टेमकर बेपत्ता होते. नारवाडी-हदियाबाद परिसरात शुक्रवारी सकाळी पुलाच्या कडेला मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. सरपंच आसिफ पटेल आणि गौरव विधाटे यांनी गंगापूरचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनाही माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. त्यानंतर मृतदेह भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर यांचा असल्याचे समोर आले आहे.

टेमकर यांचा मृतदेह सापडल्यानंतर संभाजीनगरसह गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. टेमकर यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि चार बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मृत्यूबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. गंगापूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.