छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली मुलांना घेऊन जात असलेल्या एका रिक्षा चालकाचा चार ते पाच जणांनी तलवार व चाकूने वार करून निर्घृण खून केला. प्रकरणात पोलिसांनी आरोपींपैकी दोघांना बाळापूर फाटा, बीड बायपास येथून ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून १३ इंच लांबीचा फोल्डिंग चाकू, ३३.५ इंच लांबीची तलवार व गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच-०४-डीआर-३६७७) जप्त करण्यात आली आहे.
सद्दाम हुसेन सय्यद मोईनोद्दीन (३२, रा. भीमनगर, भावसिंगपूरा) व शेख इरफान शेख सुलेमान (३२, रा. शहानगर, बीड बायपास) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.व्ही. मुसळे यांनी दिले आहेत. तर अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सय्यद सलमान सय्यद शफीक (३५, रा. समतानगर, गल्ली नं.५, क्रांतीचौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ सय्यद इमरान सय्यद शफीक याच्यावर रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली काही जणांनी तलवारीने हल्ला केला. जखमी इमरान याला सलमान सय्यद व त्यांचा मित्र शेख तबरेज यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यानंतर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सातारा पोलिसांनी विविध पथके तयार केली. गुन्ह्याचा तपास सुरु असतांना संशयित वाहन बाळापूर फाट्याजवळ आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती आधारे पोलिसांनी सापळा रचून वाहनासह सय्यद सद्दाम व शेख इरफान यांना अटक केली. त्यांच्याकडून रक्ताने माखलेली तलवार, चाकू, स्कॉर्पिओ तसेच रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले.
जुन्या वादातून हत्या
मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पडेगाव येथे राहणारे सय्यद मुजीब सय्यद मोईनोद्दीन, सय्यद सद्दाम, सय्यद शादाब, सय्यद मोसीन, शाहरूख कुरेशी, अतीक कुरेशी व अन्वर कुरेशी यांच्याशी पूर्वी वाद होता. ३१ मे २०२५ रोजीही जुन्या वादातून हल्ला झाल्याची नोंद छावणी पोलिस ठाण्यात झाली होती. त्याच वैमनस्यातून इमरानचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
वादाची पार्श्वभूमी
पोलिसांच्या माहितीनुसार, सय्यद मुजीब याचे गो गॅस नावाचे घरगुती गॅसचे दुकान आहे. यावरून मुजीब व सलमान सय्यद यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादातून दोन्ही गटांत संघर्ष होऊन छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दहा दिवसांची पोलिस कोठडी
आरोपी सय्यद सद्दाम व शेख इरफान यांना गुरुवारी दि.२ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपींनी गुन्ह्याचा कट कुठे व कसा रचला, उद्देश काय होता व इतर साथीदारांना अटक करायची असल्याने पोलिसांनी दहा दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने आरोपींना १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
चाचा, पापा को तलवार से मारा
घटनेनंतर इमरानचा अकरा वर्षांचा मुलगा आपल्या काकाला फोनवर म्हणाला, चाचा, मै पापा और छोटा भाई रेल्वे ब्रीज के नीचेसे जा रहे थे. पाच-छ लोग आये. पापा को तलवार से मारा है. पापा रास्ते पे गिर गये है. आप जल्दी आओ.
मृतदेहासह आयुक्तालयात नातेवाईक
गुरुवारी सकाळी मृत इमरानचे पार्थिव घेऊन त्याचे नातेवाईक व परिसरातील नागरिक थेट पोलिस आयुक्तालयात गेले. मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी क्यूआरटी पथक बोलावले. नातेवाईकांव्यतिरिक्त आलेल्यांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, पोलिस उपायुक्त व एसीपींनी मृताच्या कुटुंबाशी चर्चा करून कारवाईची माहिती दिली. मृताच्या नातेवाईकांनी सय्यद मुजीब उर्फ डॉन व त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेण्याची मागणी केली.