छत्रपती संभाजीनगर : दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पैठणमध्ये पितृपंधरवड्यात कावळेच दिसेनासे झाले आहेत. अतिवृष्टीमुळे घाट पाण्याखाली असून कावळयांनीही तात्पुरते स्थलांतर केले आहे. त्यामुळे पिंडदान केल्यानंतर ‘काक’स्पर्शाची पंचाईत झाली आहे. ही स्थिती नदीकाठच्या घाट असणाऱ्या सर्व गावांमध्ये असल्याचे सांगण्यात येते.
काळे ढग, पाऊस नाही अशा ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करतात. पाऊस थांबल्यानंतर पक्षी-प्राणी मरून पडलेल्या ठिकाणी परतात. त्यामुळे कावळे मरण्याचे प्रमाण तसे कमी असते. ढग ज्या दिशेने येतात त्याच्या विरुद्ध दिशेला ते पळतात. या वर्षी अतिवृष्टीचा परिणाम पक्ष्यांवर अधिक झाला आहे. मुसळधार पावसाच्या माऱ्याने पक्ष्यांची घरटी मोडून पडली आहेत. परिणामी अनेक घरट्यांमधील अंडीही फुटली. मे ते जून-जुलै महिन्यात चिमणी, कबुतरं, बुलबुल, कोकिळ आदी प्रजनन झालेल्या पक्ष्यांनी घरट्यांमध्ये अंडी घातलेली होती. पावशाचेही अंडी असतात, पण तो दुसऱ्यांच्या घरट्यांमध्ये अंडी घालतो. ही अंडीही घरटे पडल्याने फुटली आहेत असे कुणाल विभांडिक आणि प्रा. संतोष गव्हाणे यांनी सांगितले.
पैठण मधे जांबुळबन आदी भागात पावसाने मोठे नुकसान झाले असून, या भागात कावळ्यांची संख्या चांगली असते. आता ते इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. शिवाय जायकवाडी प्रकल्पातून विसर्गही सुरू आहे. हे सर्व थांबेल तेव्हाच कावळेही परततील, असे पक्षी अभ्यासक सांगतात. पैठणच्या घाटावरही गेल्या काही दिवसापासून पिंडदान करण्यास फारसे कोणी येत नसल्याचे सांगण्यात आले.
मराठवाड्यातील ६४० गावांमध्ये १४ व १५ सप्टेंबरला अतिवृष्टीची नोंद असून, ३२ मंडळांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यात पैठण तालुक्यामधील पैठण (१९१ मिमी), पिंपळवाडी (११५), बिडकीन (८७.५), ढोरकीन (१०४), बालानगर (१०५), नांदर (२०८), पाचोड (१०७), लोहगाव (१५९) व विहामांडवा (१९९ मिमी) या दहा मंडळांचा समावेश आहे. या पावसाचा प्राणी-पक्षी जीवनावर मोठा परिणाम झाला असून दोन मेंढपाळांच्या ५४ मेंढ्या, शेळया, कोकरू, बैलं दगावली असून, घरांचीही पडझड झाल्याची माहिती पंचानाम्यातून पुढे आली आहे.
पिंडस्पर्धासाठी कावळ्यांची प्रतीक्षा दोन-दोन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. कावळ्यांची संख्या प्रचंड कमी दिसत असून, यंदा पिंडदानासाठी येणाऱ्या यजमानांचीही संख्याही रोडावली आहे. – प्रदीप महेशपाठक, किरवंत.
पैठणमध्ये पितृपंधरवड्यात पिंडदानासाठी येणाऱ्या यजमानांची संख्या रोडावली आहे. काही किरवंतांकडे मागील बारा दिवसांमध्ये बोटावर मोजण्याइतकेच यजमान आले आहेत. गतवर्षी याच्या उलट परिस्थिती होती. किरवंतांकडे विधिसाठी वेळ नव्हता. या चित्राचा परिणाम पितृपंधरवड्यातील अर्थकारणावर झाला आहे. ऑटोरिक्षा, हाॅटेल, लाॅजेस यामध्ये काही जण किंवा यजमानांची नातेवाईक उतरत असतात. यंदा असे चित्र दिसत नाही, असे काही किरवंतांमधून सांगण्यात येते.
नुकतीच अंड्यातून बाहेर आलेल्या पक्ष्यांची पिल्लं पावसात भिजल्याने थंडी वाजून कुडकुडतात किंवा त्यांना हायपोथर्मिया होतो. म्हणजे पावसाच्या पाण्यात पंख भिजल्याने पक्षांची ऊर्जा कमी होते. परिणामी पक्षी दगावण्याची शक्यता अधिक असते. – कुणाल विभांडिक, पक्षी अभ्यासक
पाऊस प्रचंड झाला, सुदैवाने झाडे पडली नाहीत, पण पावसाच्या माऱ्याने घरटी मात्र कोसळली. पक्षांची अंडी नष्ट झाली. कावळ्यांची संख्या रोडावली आहे. स्थानिक पक्षी किंवा कावळे तात्पुरते स्थलांतरित झाल्याचे चित्र दिसत आहे. – प्रा. संतोष गव्हाणे, पक्षी अभ्यासक, पैठण