औरंगाबाद, पुणे विभागीय फेरीसाठी नाटय़प्रेमी विद्यार्थ्यांची गर्दी; प्रक्षेपण ‘झी टॉकीज’वर
औरंगाबाद : आशयघन संहिता, अभिनय, उत्तम नेपथ्य रचना, प्रकाश व्यवस्था आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या म्हटल्या तर किरकोळ, म्हटल्या तर गंभीर, अशा पण समाजमन बिघडवणाऱ्या घटनांवर भाष्य करणाऱ्या एकांकिकांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. महाविद्यालयीन तरुण रंगकर्मीच्या सळसळत्या उत्साहात औरंगाबाद विभागीय प्राथमिक फेरीला गुरुवारपासून प्रारंभ झाला.
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या निराला बाजार भागातील तापडिया नाटय़ मंदिरात सकाळी १०.३० च्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत नटराजाचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. व्यासपीठावर परीक्षक नितीन धंदुके, अमेय उज्ज्वल, आयरिस प्रॉडक्शनचे प्रमुख विद्याधर पठारे, विवेक रानवडे, चितळे डेअरीचे ओंकार फडके, ‘लोकसत्ता’च्या औरंगाबाद विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक वंदन चंद्रात्रे आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्यशास्त्र विभागाची ‘द सेंटिनल’ या एकांकिकेने करण्यात आली. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयाची ‘काळोखाचा रंग कोणता’, नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आर्ट्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाची ‘हेल्प लेस’, जालना येथील आर. जी. बगाडिया आर्ट्स, एम.बी. लखोटिया कॉमर्स अॅण्ड आर. बेन्झान्जी सायन्स कॉलेजची ‘खरा शिवभक्त’ या एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले.
सामाजिक, महामानवांचे विचार कृतीत अमलात आणण्याऐवजी त्यांच्या नावाच्या आधार घेण्याचेच होत असलेले प्रकार, शहरी आणि बेटावरील माणसांमधील नातेसंबंधातील दरी, आदी विषयांचे सादरीकरण तरुण रंगकर्मीनी एकांकिकांमधून केले. विभागीय प्राथमिक फेरीत उद्या, ६ डिसेंबर रोजी उर्वरित महाविद्यालयांकडून आलेल्या संघांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सायंकाळी परीक्षक निवडक एकांकिकांची १० डिसेंबर रोजी होणाऱ्या विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करतील.
लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकांकिका’ स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकाच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिके त संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.