सुहास सरदेशमुख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजीनगर : करोना काळात बंद पडलेली ‘डेक्कन ओडिसी’ ही आलिशान रेल्वेगाडी सुरू झाली आणि पुढील वर्षभरातील सर्व फेऱ्यांच्या आगाऊ नोंदी पूर्ण झाल्या आहेत. या रेल्वेमध्ये केलेल्या इंजिन बदलामुळे आणि जेवण बनविण्यासाठी द्रवरूप नैसर्गिक वायूऐवजी ‘इंडक्शन’च्या वापरामुळे किती कार्बन उत्सर्जन कमी झाले याचा अभ्यास हाती घेण्यात आला आहे. पुढील तीन-चार फेऱ्यांनंतरच्या नोंदी व ऊर्जावापर याचा अभ्यास करून पर्यावरणपूरक पर्यटनामुळे किती कार्बन उत्सर्जन वाचविले गेले याची गणिते मांडली जातील, असे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या संचालक श्रद्धा जोशी यांनी सांगितले.

करोना काळानंतर पुन्हा सुरू झालेल्या या रेल्वे गाडीमध्ये करण्यात आलेले बदल खूप चांगले आहेत. अगदी पडदे, गाडीमधील गालिचे पटकन आग पसरविण्यापासून रोखणारे असल्याचे पर्यटन विभागाच्या सचिव राधिका रस्तोगी यांनी सांगितले.

हेही वाचा>>>“आदू बाळानं सरकारला सळो की पळो करून सोडलं”, भाजपाच्या ‘त्या’ टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

डेक्कन रेल्वेचे डिझेल इंजिन आता विजेवर करण्यात आले आहे. तसेच स्वयंपाकही आता ‘एलपीजी’वर होत नाही. त्यामुळे वाचणारी ऊर्जा पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जात आहे. पुढील काही दिवसांत कार्बन उत्सर्जन किती कमी झाले, याचा अभ्यास पूर्ण केला जाणार असून, नोव्हेंबरमध्ये तो पूर्ण होईल, असे जोशी यांनी सांगितले.

खरे तर शाश्वत व निसर्गपूरक पर्यटनासाठी आवश्यक ते धोरण अद्याप ठरविण्यात आलेले नाही. मात्र, यामध्ये आता नवनवे बदल केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यावरण विभागाकडून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या कार्यपद्धतीस आता श्रेयांक दिले जाणार असून, त्यानुसार त्या त्या क्षेत्रांतील सवलती निर्धारित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra tourism corporation decision to study the carbon emission reduction after the change in deccan odyssey amy